तुळजापूर – धाराशिव हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी जिल्हा, जिथे चांगला पाऊस हा थोड्या काळात येणारा दुर्मिळ पाहुणा. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाच्या सावटातून मुक्त करण्यासाठी विविध योजना आखल्या गेल्या, पण त्या बहुतेक वेळा फक्त चर्चेपुरत्याच राहिल्या. त्यापैकी एक मोठी योजना म्हणजे “कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प.” या प्रकल्पात कृष्णा खोऱ्यात वाहून जाणारे पाणी धाराशिवसह इतर मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये आणण्याचा प्रकल्प आखण्यात आला होता. प्रकल्पाचे नाव गोंडस असले तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प जिल्ह्याच्या लोकांसाठी एका धूसर स्वप्नाप्रमाणे राहिला आहे.
हा प्रकल्प माजी पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या डोक्यात तब्बल ४० वर्षांपूर्वी आला होता. त्यांनी या योजनाचे गाजर लोकांना दाखवले आणि वर्षानुवर्षे हा प्रकल्प “लवकरच सुरू होईल” या वाक्याशीच ओळखला गेला. आता त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील देखील त्याच गाजराच्या आधारे दोनदा निवडणुका जिंकून बसले आहेत, एकदा विधानसभेत तर एकदा लोकसभेत पराभव पचवून! तरीही, योजना पूर्ण होताना दिसत नाही.
आता मात्र, काहीतरी प्रगती झाल्यासारखी दिसतेय. पण खरं पाहता, अजून तीन ते पाच वर्षे प्रकल्प पूर्ण होण्यास अवकाश आहे. त्यातच विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात येऊ घातली आहे, त्यामुळे कामाचा वेग आणि नेताजींच्या वचनांचा वेग यांच्यात एक शर्यत सुरू झाली आहे. राणा पाटील यांनी महिला मतदारांना खुश करण्यासाठी साड्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आणि आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी “कृष्णा खोऱ्याचे पाणी आले!” असे सांगून आनंद उत्सव साजरा केला.
तुळजापूरमधील सिंदफळ गावात आयोजित केलेल्या या “पाणी आले” उत्सवात जुनी धूळ खात पडलेली टाकी नवा रंग लावून सजवण्यात आली. गावकऱ्यांना पाणी मिळो वा न मिळो, पण रंगवलेली टाकी मात्र लखलखीत दिसली! या टाकीच्या रंगरंगोटीचा उत्सवच जोरदार झाला, जणू काही सगळ्या गावात पाण्याचा पूरच आलाय!
तथापि, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना हा रंगरंगोटीचा उत्सव मुळीच पचला नाही. “काम अर्धवट असताना, हे सगळं कश्यासाठी?” असा सवाल करत त्यांनी या रंगाच्या खेळावर पाणी फेरलं! कार्यक्रमात घुसून त्यांनी तुफान राडा केला, नेत्यांना सरळसरळ सवाल विचारले. यामुळे आमदार राणा पाटील संतापले आणि थेट धीरज पाटील यांना “अरे बाळा!” म्हणत कुत्र्याची उपमा देऊन त्यांना शब्दांचे दणके दिले. शाब्दिक ठोशांमुळे वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला.
या पाणी आणि रंगाच्या खेळात, शेवटी पाणी काही आलं नाही, पण गाजर दाखवण्याचं नाटक मात्र जोरात सुरू आहे. लोकांच्या आशा आणि नेत्यांची आश्वासनं यांच्या खेळात मतदार अजूनही गोंधळलेले आहेत. आता, हे रंगवलेलं गाजर खरोखरच पचतं की पुढच्या निवडणुकीत लोकांनी नेत्यांना पाणी दाखवलं, हे पाहणं रोचक ठरणार आहे.