तुळजापूर : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका दरोड्याची भर पडली आहे. श्री तुळजाभवानी रोडवरील बोबले हनुमान चौकात सोमवारी रात्री आठ वाजता, वर्दळ असतानाही चार दरोडेखोरांनी निर्ढावलेल्या पद्धतीने दरोडा टाकला. त्यांनी महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून अडीच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले.
ही घटना आण्णासाहेब रोचकरी यांच्या वाहिनींसोबत घडली. दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करत ऐवज लुटला. भर वस्तीत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुन्हा घडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवत ठिय्या आंदोलन केले. सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
विशेष म्हणजे, तुळजापूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, एमडी ड्रग्जसारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत आहे. याचा निषेध करण्यासाठी शहरातील काही नागरिक बैठक घेत असतानाच दुसरीकडे हा दरोडा टाकला गेला. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, भर वस्तीत, लोकांच्या डोळ्यांसमोर असे प्रकार घडत असताना पोलिसांची अनुपस्थिती आणि कारवाईतील दिरंगाई यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
Video