तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. प्रचाराला अवघे आठ दिवस शिल्लक असल्यामुळे मतदारसंघात राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, परंतु भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत असताना, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचारात माजी आमदार मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे हे सक्रिय न झाल्याने त्याचा फटका धीरज पाटील यांना बसणार का ? याची चर्चा सुरू आहे.
मधुकरराव , जगदाळे शांत , भूमिका अस्पष्ट
काँग्रेसचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर मतदारसंघातील एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी आठ वेळा निवडणूक लढवली असून, पाच वेळा निवडून आले आहेत. यावेळी काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिल्याने चव्हाण यांच्यात नाराजी निर्माण झाली. त्यामुळेच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. जरी चव्हाण यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांनी आपली राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांचा समर्थक गट काँग्रेसच्या विरोधात काम करू शकतो किंवा तटस्थ राहू शकतो, ज्याचा फटका धीरज पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे हेही तुळजापूरच्या राजकारणातील प्रभावी नेते आहेत. त्यांनी सुरुवातीला बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला होता, परंतु त्यानंतर अर्ज मागे घेतला. तरीही त्यांनी आपली भूमिका अजून जाहीर केलेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. विशेषतः नळदुर्ग आणि परिसरात जगदाळे यांचे समर्थक कार्यकर्ते शांत राहिल्याने मतांची मोठी उलथापालथ होऊ शकते.
भाजपचे शक्तिप्रदर्शन
भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रविवारी तुळजापुरात भव्य आशीर्वाद यात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने समर्थकांची उपस्थिती मिळवून काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पाटील यांची ताकद आणि जनाधार यामुळे भाजपचे स्थान अधिक बळकट झाल्याचे दिसते. या शक्तिप्रदर्शनाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा संचारली असून, राणा पाटील यांच्या विजयासाठी संपूर्ण संघटना कामाला लागली आहे.
हे तीन उमेदवार काँग्रेसचे गणित बिघडवणार !
तुळजापूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी, प्रहार जनशक्तीचे आण्णासाहेब दराडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी देखील तुळजापूर मतदारसंघ ढवळून काढला आहे.
समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी यांनी मागील एका निवडणुकीत ३७ हजार मते घेतली होती. त्यांना मानणारा एक वर्ग आहे. रोचकरी यांची सायकल जोरात पळत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे या धनगर समाजाच्या आहेत. जय ओबीसी म्हणून त्यांनी प्रचाराला रंगत आणली आहे. या मतदारसंघात धनगर समाज आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. सोनकाटे किती मते घेणार आणि कुणाची मते काटणार , निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
प्रहार जनशक्तीचे उमेदवार आण्णासाहेब दराडे हे सुरवातीपासून चर्चेत आहेत. गावोगावी भेटी देऊन, अभिनव आंदोलन करून, वातावरणात रंगत आणली आहे.
मतदान २० नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी आहे. सध्या राणा जगजितसिंह पाटील हे नंबर १ वर तर अन्य चार उमेदवारात मोठी रस्सीखेच सुरु आहे