तुळजापूर: तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा कायापालट करून जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हे आपले ध्येय आहे, असे महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रविवारी आयोजित आशीर्वाद यात्रेत सांगितले. मागील पाच वर्षांत तुळजापूर मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देत पाटील यांनी, पुढील काळात दोन हजार कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर शहरात भव्य आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी राणा पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने यात्रेला सुरुवात झाली. भवानी रोड, महाद्वार रोड, कमान वेस गल्ली मार्गे तुळजाभवानी मंदिरापर्यंत ही आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. यात्रेनंतर आयोजित सभेत पाटील यांनी विकासकामांची माहिती दिली.
“आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आम्ही या प्रचाराला सुरुवात केली आहे, आणि आमचा अजेंडा एकच आहे – विकास, विकास आणि फक्त विकास,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असून स्थानिक व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे. पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना सांगितले की, त्यांनी रेल्वे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला नव्हता, परंतु महायुती सरकारने ४५० कोटींचा निधी मंजूर करून रेल्वेमार्गाचे काम सुरू केले आहे.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफीसह मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, महिलांसाठी दर महिन्याला दीड हजार रुपयांची योजना सुरु केली आहे, असे सांगून पाटील यांनी विकासाच्या आगामी योजनांची माहिती दिली.