तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धार आणि विकास आराखड्याच्या कामावरून महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, “महायुतीतीलच काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत,” असा गंभीर आरोप करत थेट घरचा आहेर दिला आहे. या षडयंत्राची तातडीने चौकशी करून सूत्रधारांना उघड करावे, अशी मागणी त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार पाटील यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख थेट जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (शिवसेना, शिंदे गट) यांच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आमदार राणा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार करून तुळजापूर आणि मंदिराच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. महायुती सरकारने तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल १८६५ कोटी रुपयांचा अभूतपूर्व निधी मंजूर केला असताना, या ऐतिहासिक कामात ज्यांचे योगदान शून्य आहे, असे महायुतीतीलच काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत. यामुळे भाविकांच्या मनात नाहक संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण होत आहे.
आ. राणा पाटील यांचा रोष नेमका कुणावर?
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याचे मानले जात आहे. श्री तुळजाभवानी विकास आराखड्याचे अध्यक्षपद पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे, तर आमदार राणा पाटील हे तुळजाभवानी मंदिर समितीचे सदस्य आणि स्थानिक आमदार आहेत. विकासकामांच्या श्रेयवादावरून आणि कार्यपद्धतीवरून दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता आमदार पाटील यांनी थेट पत्राद्वारे तक्रार केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे. पाटील यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी, “महायुतीतीलच विरोधक” हा त्यांचा शब्दप्रयोग थेट पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य करणारा आहे, असे मानले जात आहे.
या पत्रामुळे आता चेंडू सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कोर्टात गेला आहे. ते यावर काय भूमिका घेतात, संबंधितांची बैठक घेऊन चौकशीचे आदेश देतात का, आणि या तथाकथित “षडयंत्रामागील सूत्रधार” कोण हे समोर येते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्य मुद्दे:
- तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार कामावरून आमदार राणा पाटील आक्रमक.
- “महायुतीतीलच काही शून्य योगदान असणारे विरोधक खोटी माहिती पसरवत आहेत,” राणा पाटलांचा थेट आरोप.
- पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर.
- षडयंत्राच्या चौकशीसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्र.