तुळजापूर : अंगावर का थुंकतो, असे विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने ५७ वर्षीय इसमास शिवीगाळ करत कड्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सायस धोंडीबा शेंडगे (वय ५७ वर्षे, रा. ढेकरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दिनांक २० मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे १०:४० वाजता ढेकरी येथे आरोपी सुरज सायस कांबळे (रा. ढेकरी) याने फिर्यादी शेंडगे यांच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार घडला. शेंडगे यांनी आरोपी कांबळे याला ‘अंगावर का थुंकतो’ असे विचारले असता, याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपी सुरज कांबळे याने फिर्यादी सायस शेंडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हातातील कड्याने मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. आरोपीने यावेळी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर सुमारे १८ दिवसांनी, दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी सायस शेंडगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपी सुरज सायस कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११७(२) (गंभीर दुखापत), ११५(२) (धमकी), ३५२ (शिवीगाळ), ३५१(२) (मारहाण), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तुळजापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.