आई तुळजाभवानीच्या नावाने ज्या भूमीला पावित्र्य लाभले, त्या तुळजापुरात आज ‘ड्रग्ज’चा सुळसुळाट व्हावा, हे केवळ दुर्दैवी नाही, तर चीड आणणारे आहे. पण त्याहूनही संतापजनक बाब म्हणजे, जे हात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलत आहेत, त्याच हातांना राजकीय ‘शुद्धीकरणा’चा स्पर्श दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना दिलेला ‘शानदार’ प्रवेश, हा सत्तेच्या हव्यासापोटी गाठलेला नीतिमत्तेच्या ऱ्हासाचा कळस आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे काही साधेसुधे प्रकरण नाही. यात राजकीय नेतेच विक्रते आणि त्यांचे कार्यकर्तेच सेवन करणारे असल्याचा गंभीर आरोप आहे. दोन माजी नगराध्यक्ष आणि एका माजी नगराध्यक्षाच्या पतीवर (विनोद गंगणे) थेट आरोप आहेत. हाच गंगणे, जो स्थानिक आमदार राणा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो, त्याला पोलिसांनी ‘टीप देणारा’ ठरवून जामिनावर मोकळे सोडल्याचा प्रकार ताजा आहे.
याच गंगणेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार सोहळा घडवून आणत स्वतःचे ‘उदात्तीकरण’ करण्याचा प्रयत्न केला. तो वाद शमतो न शमतो तोच, आता त्याच ड्रग्ज प्रकरणातील आणखी दोन आरोपी, माजी नगराध्यक्ष संतोष कदम आणि बापू कणे, यांना थेट आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या हातूनच तिजोरीच्या चाव्या’ देण्यासारखा आहे.
भारतीय जनता पक्ष स्वतःला ‘शिस्तप्रिय’ आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो. पूर्वी याच पक्षात प्रवेश देताना गुन्हेगारी पार्श्वभूमीची कठोर छाननी होत असे. पण तुळजापूरच्या या घटनेने भाजपच्या त्या सर्व जुन्या निष्ठांना तिलांजली दिल्याचे दिसते. आता पक्षात प्रवेशासाठी ‘चारित्र्य’ नाही, तर ‘निवडून येण्याची क्षमता’ हाच एकमेव निकष उरला आहे का? आणि ही क्षमता जर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींमध्ये दिसत असेल, तर हा या पक्षाचा वैचारिक गोंधळ नसून, सत्तेसाठी केलेला निर्लज्जपणाचा सोहळा आहे.
आमदार राणा पाटलांना नेमके काय साध्य करायचे आहे? ज्यांच्यावर ड्रग्ज विकल्याचा, एका तीर्थक्षेत्राला बट्टा लावल्याचा गंभीर आरोप आहे, अशा लोकांना पक्षात घेऊन ते जनतेला काय संदेश देत आहेत? हा ‘ड्रग्ज माफियांचे उदात्तीकरण’ करण्याचाच प्रकार नाही का? नगरपालिका जिंकण्यासाठी इतके खालच्या थराला जाण्याची गरज का पडावी?
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या ‘राजाश्रया’वर बोट ठेवले आहे. त्यांची चिंता रास्त आहे. जेव्हा व्यवस्थेचा भाग असलेले लोकच आरोपींना संरक्षण देऊ लागतात, तेव्हा सामान्यांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची?
हा फक्त एका पक्षाच्या प्रवेशाचा विषय नाही. हा विषय तुळजापूरच्या अस्मितेचा आहे. हा विषय त्या हजारो तरुण मुला-मुलींच्या भविष्याचा आहे, ज्यांना ड्रग्जच्या विळख्यापासून वाचवण्याची जबाबदारी याच नेत्यांवर होती. मात्र, इथे ‘कुंपणच शेत खात’ असेल, तर दाद मागायची कुठे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या पत्राची काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ते आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या या कृतीवर पांघरूण घालणार, की ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्रा’साठी खरोखरच कठोर पाऊल उचलणार? तुळजापूरच्या जनतेचे डोळे आता मुंबईकडे लागले आहेत. कारण प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही, तर एका पवित्र शहराच्या अस्तित्वाचा आहे!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह






