धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांना ज्या आरोपीचा मागमूसही लागलेला नाही, तोच आरोपी चक्क कोर्टात हजेरी लावतो आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा निसटतो! ही एखाद्या मराठी थ्रिलर सिनेमाची गोष्ट वाटावी, पण हा प्रकार अगदी खराखुरा आहे आणि तो घडला आहे धाराशिव न्यायालयात.
विनोद उर्फ पिंटू गंगणे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी. गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेल्या गंगणेने 13 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अटकपूर्व जामिनासाठी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयीन कामकाज पार पडलं, पण… पोलिस मात्र मूकदर्शकच राहिले! गंगणेने आपली कारवाई पूर्ण केली, कोर्टातून बाहेर पडला आणि पुन्हा गायब झाला – अगदी बिनधास्तपणे!
पोलिसांवर संशयाची सावली
या प्रकारामुळे जिल्हा पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे आरोपी फरार असल्याचे दाखवले जाते, दुसरीकडे तोच आरोपी न्यायालयात जाऊन स्वतःहून हजेरी लावतो, आणि पोलिस त्याला अटक करत नाहीत. यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का? पोलिस जानबूजून दुर्लक्ष करत आहेत का? या प्रश्नांनी आता जोर पकडला आहे.
‘पिटू’ कोण?
विनोद गंगणे उर्फ पिटू गंगणे हा भाजपचा स्थानिक कार्यकर्ता असून, माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांचा पती आहे. चार दिवसापूर्वी त्याचे नाव मटका बुकी प्रकरणातही चर्चेत आलं होतं. तुळजापूरच्या अनेक राजकीय सभांमध्ये त्यांच्या ‘सदरहू’ उपस्थितीची नोंद आहे. त्यामुळेच गंगणेवर कुणाचा वरदहस्त आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु आहे.
कायदा म्हणजे निवडक बंधन?
सामान्य नागरिकाने कोर्टात उशिरा हजेरी लावली, तर वॉरंट, दंड, अटक अशा कारवाया होतात. पण इथे तर आरोपी फरार असूनसुद्धा तो कोर्टात हजेरी लावतो, तरीही पोलिस काहीही करत नाहीत! हा कायदाचाच अपमान नाही का?
सत्ताधाऱ्यांचं ‘डोळस’ मौन
गंगणे भाजपशी संबंधित असल्यामुळे सत्ताधारी गप्प आहेत. विरोधकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे. “हा काय पोलिसांचा गोंधळ आहे की गँगवॉर?” असा सवाल शिवसेना ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
गंगणेची ‘कोर्टातली शोभायात्रा’ हे कायद्याची पायमल्ली करणारे प्रकरण असून, पोलिस आणि न्यायव्यवस्थेतील सुसंवाद किंवा ‘समजूतदार’पणा उघड करणारा धक्कादायक प्रकार आहे.
“गंगणे जरी फरार असला, तरी पोलिसांची निष्ठा कुठे हरवली?”
हे जनतेला पडलेलं खऱ्या अर्थाने गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न आहे.
पिटू गेला, पण पोलिसांचं ‘पावसाळी छत्री’ बिंधास्तपणे उघडं पडल्याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय.