धाराशिव – तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले असून, यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित २२ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार आहेत.
या प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले असून, आज अशा दोन अर्जांवर अतिरिक्त सत्र न्यायाधिश मिटकरी मॅडम यांच्यासमोर सुनावणी झाली.
यापैकी तुळजापूर येथील आरोपी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. या अर्जावरील अंतिम निर्णय येत्या २१ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.
तर नळदुर्ग येथील इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज सुनावणी पार पडली. यामध्ये आरोपीच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडले आहे, मात्र सरकारी वकिलांचे म्हणणे मांडणे अद्याप बाकी आहे. या अपूर्ण राहिलेल्या सुनावणीसाठी न्यायालयाने पुढील तारीख २१ एप्रिल निश्चित केली आहे.
याशिवाय, मुंबई येथील आरोपी वैभव अरविंद गोळे (जी या प्रकरणातील आरोपी संगिता गोळे हिचा पती आहे) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.