तुळजापूर – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील आणखी एका बड्या माशाला गळाला लावण्यात तामलवाडी पोलिसांना यश आले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून, या अटकेमुळे ड्रग्ज माफियांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जमदाडे याला तुळजापूर तालुक्यातील कामठा येथून ताब्यात घेण्यात आले असून, आज (दि. १७ मे) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १६ झाली असली तरी, तब्बल २० आरोपी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहेत, हे वास्तव चिंताजनक आहे.
दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिसांनी तुळजापूर शहरात येणारे एमडी ड्रग्ज जप्त करत मोठी कारवाई केली होती. या कारवाईने संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरला होता. सुरुवातीला तीन संशयित आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील आणखी ३३ आरोपी निष्पन्न केले. एकूण ३६ आरोपी असलेल्या या मोठ्या रॅकेटमध्ये आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यापैकी १५ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर शरद जमदाडे या सोळाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि योग्य पद्धतीने तपास करत दहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रामुळे या प्रकरणातील आरोपींचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अजूनही २० आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे विशेष पथकासह अथक परिश्रम घेत आहेत.
शरद जमदाडे याच्या अटकेमुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंचायत समितीचा माजी उपसभापती ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील असणे, हे अत्यंत गंभीर असून यामागे आणखी मोठे लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून या ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.