तुळजापूर- तुळजापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या आणि राज्यभर गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुभम नेपते असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज विक्रेत्याचे नाव आहे. तामलवाडी पोलिसांनी बुधवारी, दि. २८ मे रोजी रात्री उशिरा तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ, भोसले गल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ३७ झाली असून, अजूनही १७ आरोपी फरार आहेत.
सविस्तर माहिती अशी की, तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी १८ जणांना अटक करण्यात आली होती तर १८ जण फरार होते. पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात तब्बल १० हजार पानांचे दोषारोपपत्रही सादर केले आहे.
बुधवारी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तामलवाडी पोलिसांच्या पथकाने शुभम नेपते या नवीन आरोपीस अटक केली. नेपते हा ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींपैकी एक असल्याचे समजते. गेल्या आठ ते पंधरा दिवसांत अटक झालेला हा तिसरा संशयित आरोपी आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांचे पथक अत्यंत नियोजनपूर्वक तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३७ आरोपी निष्पन्न केले असून, यामध्ये २६ जणांचा विक्री गटात, तर १० जणांचा सेवन करणाऱ्या गटात समावेश आहे. शुभम नेपतेच्या अटकेमुळे अटक आरोपींची संख्या १९ झाली असून, १७ आरोपी अद्याप मोकाट आहेत. फरार असलेल्या इतर आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नूतन पोलीस अधीक्षकांकडून जनतेच्या वाढत्या अपेक्षा
या प्रकरणी पूर्वीचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची अवघ्या ९ महिन्यांत बदली झाली होती. त्यांच्या जागी नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, आज त्यांच्या कामाचा सहावा दिवस आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी यापूर्वी शहरातील सुमारे ८० जणांना तसेच काही राजकीय नेतेमंडळींनाही नोटिसा बजावल्या होत्या. आता नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या प्रकरणी नव्याने शहरातील ८० जणांना नोटिसा बजावून कसून चौकशी करावी आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी तुळजापूर शहर आणि तालुक्यातून होत आहे.