तुळजापूर – दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सुरुवातीला ३ आरोपींना अटक केल्यानंतर एकूण ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी केवळ १४ आरोपींना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात यश आले असून, एक आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. तब्बल २१ आरोपी आजही मोकाट फिरत असून, गेल्या दीड महिन्यापासून एकाही नवीन आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या गंभीर प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.
माहिती देणाऱ्यांवरच उलट तपासणी?
प्रकरण गंभीर असताना, पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी या प्रकरणी लेखी जबाब देऊन माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जबाब नोंदवून घेण्याऐवजी, साक्षीदारांवरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा खोटा गुन्हा नेमक्या कोणाच्या आदेशावरून दाखल करण्यात आला, हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे. तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे प्रचंड दबावाखाली काम करत असून, त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून तो सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
याच दरम्यान, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून आणि पोलिसांचा खोटा जबाब समाजमाध्यमांवर प्रकाशित करून बदनामी केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल छत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माने यांनी स्वतः बनावट कागदपत्र तयार करून छत्रे यांचे नाव ड्रग्ज प्रकरणाशी जोडले व त्यांची बदनामी केली. पोलिसांनी चौकशी केली असता, असा कोणताही अधिकृत जबाब पोलिसांनी घेतला नसल्याचे व न्यायालयात सादर दोषारोपपत्रातही त्याचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी माने यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली (कलम ३३५, ३३६, ३३७, ३३९, ३४०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाभाऊ माने यांचा गौप्यस्फोट: आरोपांमध्ये आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे?
आपल्यावरील आरोपांवर राजाभाऊ माने यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्यांनी आपल्यावरील गुन्हा कोणताही चौकशी न करता, घाईघाईने आणि द्वेष भावनेने दाखल केल्याचा दावा केला आहे.
माने यांच्या खुलाश्यानुसार:
- त्यांनी ११/०३/२०२५ रोजी ड्रग्ज प्रकरणाविषयी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.
- या तक्रारीत विनोद उर्फ पिटू गंगणे (ड्रग्ज सेवन करणारा व व्यसनाच्या विळख्यात ओढणारा) आणि विशाल छत्रे (ड्रग्ज खरेदीसाठी भांडवल पुरवणारे व विक्रीत भागीदार) यांच्यावर कारवाईची मागणी होती.
- सपोनि गोकुळ ठाकूर यांनी ०४/०४/२०२५ रोजी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले.
- ०५/०४/२०२५ रोजी माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सपोनि ठाकूर यांच्याकडे जबाब नोंदवला, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा त्यांचा दावा आहे.
- धक्कादायक बाब म्हणजे, १६/०४/२०२५ रोजी जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या अहवालात माने यांनी नोंदवलेला जबाब समाविष्ट नव्हता.
- याबाबत सपोनि ठाकूर यांच्याशी २७/०४/२०२५ रोजी संपर्क साधला असता, “अजून आरोपींना अटक करणे बाकी आहे, तुम्ही नोंदवलेला जबाब पुरवणी आरोपपत्रात समाविष्ट करता येतो, काळजी करू नका,” असे उत्तर मिळाल्याचा व त्याचे व्हॉईस रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा माने यांनी केला आहे.
- माने यांनी सर्वात गंभीर आरोप केला आहे की, त्यांनी ०५/०४/२०२५ रोजी नोंदवलेल्या जबाबात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुळजापूर), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक (तुळजापूर) यांच्यावर आरोप केले होते. याच कारणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदारांवरील आरोपांमुळे तपास अधिकारी श्री. ठाकूर यांनी त्यांचा जबाब अहवालात समाविष्ट केला नसावा, अशी शंका माने यांनी व्यक्त केली आहे.
तपासाची दिशा आणि पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
एकंदरीत, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास भरकटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. २१ आरोपी फरार असताना आणि दीड महिन्यापासून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसताना, माहिती देणाऱ्या व्यक्तीवरच गुन्हे दाखल होणे आणि त्याच्या जबाबात शक्तिशाली व्यक्तींची नावे असल्यामुळे तो दाबला जाण्याचा आरोप होणे, हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे, अन्यथा पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.