तुळजापूर – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाने खळबळ उडवून दिली आहे. माने यांनी आपल्या जबाबात थेट स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले असून, त्यांच्या राजकीय आश्रयामुळेच विनोद (पिट्या) गंगणे आणि विशाल छत्रे यांचा ड्रग्ज विक्रीचा धंदा फोफावला आणि पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही, असा दावा केला आहे. माने यांनी ०५ एप्रिल २०२५ रोजी तामलवाडी पोलिसांच्या नोटीसनुसार हा जबाब नोंदवला.
‘आमदारच गंगणे-छत्रेंचे आका’
राजाभाऊ माने (वय ५४, रा. हडको, तुळजापूर) यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, “तुळजापूर तीर्थक्षेत्रात प्रथम ड्रग्ज सेवन करणारा व युवा पिढीला ड्रग्जच्या विळख्यात गुंतविणारा बोका विनोद (पिट्या) गंगणे व ड्रग्ज खरेदी करण्याकामी भांडवल पुरविणारे व ड्रग्ज विक्री धंद्यामध्ये भागीदारी ठेवणारा बोका विशाल छत्रे या दोन इसमांचे आका असणारे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळेच” पोलीस यंत्रणेचे हात या ड्रग्ज पेडलरपर्यंत पोहोचत नाहीत. माने यांच्या म्हणण्यानुसार, आमदार राणा पाटील हेच गंगणे आणि छत्रे यांचे मुख्य आश्रयदाते आहेत.त्यांनी दोघांच्या नावावर खुनाचा प्रयत्न (३०७), अपहरण, जुगार, खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचा तपशीलही जबाबात दिला आहे. इतकेच नव्हे, तर ड्रग्जच्या अतिसेवनामुळे गंगणे अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रात राहिला असून, त्याच्या ड्रग्ज संबंधित आजारपणात आमदार राणा पाटील यांनी त्याच्या घरी भेटी दिल्या आणि त्याच्या कुटुंबीयांशी (बंधू महंत तुकोजी गंगणे) बैठका घेतल्याची माहितीही आपल्याला मिळाली होती, असे माने यांनी म्हटले आहे.
गंगणे-छत्रे: ड्रग्ज नेटवर्क आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
माने यांनी विनोद गंगणे याला ‘पिट्या’ असे संबोधत, तोच २०२२ पासून शहरात ड्रग्ज आणून स्वतः सेवन करत होता आणि त्यानेच तरुण पिढीला व्यसनात ओढल्याचा आरोप केला आहे. विशाल छत्रे हा या धंद्यात आर्थिक गुंतवणूकदार आणि भागीदार असल्याचा दावाही त्यांनी केला. माने यांच्या मते, हे दोघेही आमदारांचे ‘खास मर्जीतले’ असून शहरात त्यांची मोठी दहशत आहे.
पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप
माने यांनी केवळ आमदारच नव्हे, तर पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील ६९ अवैध धंद्यांची (ड्रग्ज, गांजा, गुटखा, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय इ.) नावे आणि ठिकाणांसह, तत्कालीन पोलीस निरीक्षक खांडेकर, डीवायएसपी निलेश देशमुख आणि एलसीबी पीआय वासुदेव मोरे यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालत असल्याची तक्रार गृहमंत्र्यांपासून पोलीस महासंचालकांपर्यंत केली होती. या तक्रारीची चौकशी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी केली होती. असे असतानाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत ड्रग्जबाबत माहिती नसल्याचे सांगून जाणीवपूर्वक माहिती दडवली, असा आरोप माने यांनी केला आहे. तसेच, सध्याचे तुळजापूर पोलीस स्टेशनमधील एपीआय सुरेश नरवडे आणि पोलीस निरीक्षक हे आपल्या तक्रारींवर कारवाई न करता आरोपींना वाचवत आहेत आणि पोलीस रायटर गणेश माळी हा आपल्या तक्रारींची माहिती आरोपी व त्यांच्या वकिलांना पुरवत असल्याचा खळबळजनक दावाही केला आहे. यासाठी संबंधित पोलीस, आरोपी आणि वकिलांच्या मोबाईल CDR तपासण्याची मागणीही त्यांनी केली.
जीविताला धोका आणि एनसीबी चौकशीची मागणी
माने यांनी जबाबात म्हटले आहे की, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दिल्यापासून गंगणे, छत्रे आणि पोलीस संगनमत करून आपल्याला व कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आणि हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस ठाण्यातील ‘छोटा आका’ आनंद कंदले हा पोलीस निरीक्षकांचे कान भरत असल्याने आपल्याला ‘मसाजोग’ सारखी घटना घडण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी त्यांनी एनसीबी (Narcotics Control Bureau) चौकशीची मागणी केली आहे.
अवैध संपत्ती आणि आदित्य माळी प्रकरण
गंगणे आणि छत्रे यांनी ड्रग्ज व अवैध धंद्यातून अमाप संपत्ती जमवली असून, ती जप्त करण्याची मागणीही माने यांनी केली आहे. तसेच, १०८ भक्त निवासमधील कामगार आदित्य माळी याला गंगणे बंधू आणि सुरज साठे यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला, कारण तो ड्रग्जच्या आर्थिक व्यवहारांची माहिती उघड करेल अशी भीती त्यांना होती, असा दावा करत आदित्य माळीचा शोध घेऊन तपास करण्याची मागणी केली आहे.
राजाभाऊ माने यांच्या या स्फोटक जबाबाने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले असून, यात राजकीय लागेबांधे आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या आरोपांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.