धाराशिव: तीर्थक्षेत्र तुळजापूर सध्या ड्रग्ज प्रकरणाच्या वादळात चांगलंच सापडलं आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात एकूण ३६ आरोपी असून, त्यापैकी १८ गजाआड आहेत तर १८ अजूनही पोलिसांना गुंगारा देत आहेत. तब्बल १० हजार पानांचं जम्बो दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा न्यायालयात दाखल झालं असतानाच, या प्रकरणात आता एक नवा आणि तितकाच ‘हट के’ ट्विस्ट आला आहे.
सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह? मानेंची कोर्टात एन्ट्री!
तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी थेट न्यायालयात धाव घेत एक अर्ज दाखल केला. त्यांची मागणीही तशीच धक्कादायक! म्हणे, “मला या प्रकरणात साक्षीदार करा आणि तपास अधिकारी गोकुळ ठाकूर, डीवायएसपी निलेश देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, विजय गंगणे यांच्यासह आठ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करा!” या अर्जाने पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली.
कोर्टात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’: ना मंजुरी, ना नामंजुरी!
२७ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश ( क्रमांक २ ) मिटकरी मॅडम यांच्यासमोर माने यांच्या अर्जावर सुनावणी झाली. पण माने यांना कोर्टाने चांगलेच फटकारले. “असा अर्ज दाखल करता येत नाही,” असं कोर्टाने स्पष्ट केलं. यावर माने यांनीही लगेच पवित्रा बदलला, “ठीक आहे, मग अर्ज नामंजूर करा, म्हणजे मला हायकोर्टात जाता येईल.” पण कोर्टानेही इथे वेगळाच डाव टाकला! अर्ज मंजूरही केला नाही आणि नामंजूरही नाही, थेट ‘पेंडिंग’ ठेवून टाकला! आता या ‘पेंडिंग’ मागचं इंगित काय, याचीच चर्चा जोरदार सुरू आहे.
जबाब की ‘सोशल’ जबाब? माने यांच्यावरच उलटला डाव!
याआधी, पोलीस आणि आमदार राणा पाटील यांनी आवाहन केलं होतं की, “ज्यांना ड्रग्ज प्रकरणाबद्दल माहिती आहे, त्यांनी पुढे यावं.” याला प्रतिसाद देत माने यांनी, “माझ्याकडे सगळी माहिती आहे,” म्हणत लेखी म्हणणं सादर केलं. पण तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी त्यांचा जबाबच नोंदवला नाही, असा आरोप माने करत आहेत. इतकंच नाही, तर जबाब नोंदवला नसतानाही तो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याचा ठपका ठेवत, विशाल छत्रे नावाच्या व्यक्तीने माने यांच्याविरोधातच तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे, माहिती देणाराच अडचणीत!
माने यांचे खळबळजनक दावे आणि पुढचं संकट?
राजाभाऊ माने यांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आणि ड्रग्ज रॅकेटवर गंभीर आरोप केले आहेत. जर न्यायालयाने त्यांचा अर्ज विचारात घेतला, तर या प्रकरणातील विद्यमान आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या तरी, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका रोमांचक वळणावर आला असून, कोर्टाच्या ‘पेंडिंग’ निर्णयामुळे आणि माने यांच्या आरोपांमुळे प्रकरणाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त!