धाराशिव: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात एक नवीन आणि खळबळजनक वळण आले आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीच्या पत्नीने आपल्या पतीला यात सूडबुद्धीने गोवण्यात आल्याचा आरोप केला असून, पतीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या टेस्टमुळे अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांची नावे समोर येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
या प्रकरणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण ३७ आरोपी असलेल्या या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली असून १८ आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात तब्बल १० हजार पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.
फरार असलेल्या १८ आरोपींपैकी नळदुर्ग येथील रहिवासी असलेल्या इन्द्रजीत उर्फ मिठू ठाकूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर, इन्द्रजीत ठाकूर यांच्या पत्नी स्वप्नाली कराड-ठाकूर यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पत्नीचे गंभीर आरोप आणि नार्को टेस्टची मागणी
स्वप्नाली कराड-ठाकूर यांच्या मते, त्यांचे पती इन्द्रजीत यांना विनाकारण आणि केवळ सूडबुद्धीने या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, इन्द्रजीत यांनी नळदुर्ग शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांविषयी आणि काही पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या होत्या. याचाच राग मनात धरून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले.
“या प्रकरणात नाव गोवण्यापूर्वी माझ्या पतीकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती रक्कम देण्यास नकार दिल्यामुळेच त्यांचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले,” असा खळबळजनक आरोप स्वप्नाली यांनी केला आहे.
पोलिसांसाठी खबऱ्या ते खोट्या गुन्ह्यांचा प्रवास?
स्वप्नाली यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, २०२१ साली त्यांचे लग्न होण्यापूर्वी इन्द्रजीत पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करत होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी हे काम सोडून दिले आणि परिसरातील अवैध धंदे व पोलिसांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून त्यांच्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि आता ड्रग्ज प्रकरणातही त्यांचे नाव गोवण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या.
“जर माझ्या पतीची नार्को टेस्ट केली, तर या प्रकरणामागील अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि काही राजकारण्यांचे चेहरे उघड होतील,” असा विश्वास स्वप्नाली कराड-ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आणि नार्को टेस्टच्या मागणीमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आरोपांवर पोलीस प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.