धाराशिव : तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठा भांडाफोड झाला असून मुंबईतील मुख्य तस्कर संगीता गोळे हिचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. तपासात तिच्या घरातून अर्धा किलो सोनं, चारचाकी गाडी आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संगीता गोळे हिच्या खात्यात तब्बल ५ कोटींचे व्यवहार उघडकीस आले आहेत, आणि पोलिसांनी इतर बँक खाती तसेच तिचे आर्थिक व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे.
तस्करीचे मोठे जाळे – मास्टरमाइंड कोण?
पोलीस तपासानुसार, संगीता गोळे आणि पिंटू मुळे गेल्या तीन वर्षांपासून तुळजापूरमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करत होते. सध्या संगीता पोलीस कोठडीत असून तिच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यातील संतोष खोत आणि पिंटू मुळे हे १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
या ड्रग्ज रॅकेटचे जाळे केवळ तुळजापूरपुरते मर्यादित नसून मुंबई, लोणावळा आणि इतर शहरांमध्येही पसरले असल्याचा पोलिसांना ठोस पुरावा मिळाला आहे. या तस्करीचे मुख्य फायनान्सर कोण? कोणाला आर्थिक फायदा झाला? मोठे राजकीय आणि आर्थिक मासे कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.
संपत्तीच्या मालकिणीचे धक्कादायक कनेक्शन
संगीता गोळे हिचे मुंबई आणि लोणावळ्यामध्ये मोठे नेटवर्क आणि संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तिने ड्रग्ज विक्रीतून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली असून, तीच्या बँक खात्यातील ५ कोटींपेक्षा अधिक रक्कम ही ड्रग्ज तस्करीतून मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासात पुढील गोष्टी उघड झाल्या आहेत :
✅ ड्रग्जमधून कमावलेले पैसे सोनं, म्युच्युअल फंड आणि स्थावर मालमत्तेत गुंतवले
✅ पिंटू मुळे हा संगीता गोळेच्या संपर्कात गेल्या तीन वर्षांपासून होता
✅ संगीता गोळे, तिचा पती वैभव गोळे, आणि दीर अभिनव हे संपूर्ण कुटुंब ड्रग्ज तस्करीत गुंतले आहे
✅ तस्कर संतोष खोत १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत, तर वैभव गोळे आणि पिनू तेलंग फरार
कर्जबाजारीतून तस्करीत – पिंटू मुळेची कहाणी
एकेकाळी कर्जबाजारी असलेला पिंटू मुळे ड्रग्जच्या व्यवसायात उतरल्यावर काहीच वर्षांत करोडपती झाला. पोलिसांच्या तपासात, त्याने मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा विकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
बँक खात्यात सापडले ५ कोटी – जप्ती होणार का?
पोलीस तपासात संगीता गोळे हिच्या बँक खात्यात तब्बल ५ कोटींचा उलाढाल आढळून आला आहे, हा पैसा मुंबई, सोलापूरसह इतर जिल्ह्यांतील ड्रग्ज व्यवहारातून मिळाल्याचा संशय आहे.
🚨 प्रश्न असा आहे की, एवढी संपत्ती जप्त होणार का? पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत?
🚨 ड्रग्जने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, पण याला जबाबदार असलेल्या बड्या मास्यांवर कारवाई होणार का?
१६ आरोपींवर गुन्हे दाखल, ६ अजून फरार
या प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १० जणांना अटक करण्यात आली आहे. ६ आरोपी फरार आहेत, त्यातील ४ आरोपी जेलमध्ये, ६ पोलीस कोठडीत, तर उर्वरित चौघांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी मोठे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध गुंतले आहेत. आता ही केस दडपली जाणार की दोषींवर कठोर कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.