धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ‘धाराशिव लाईव्ह’च्या धडाकेबाज बातमीने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि अखेर चार गोपनीय नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आणखी सहा नावे समोर येताच आरोपींची संख्या तब्बल २५ वर पोहोचली आहे.
आरोपींच्या आकड्यांचा वेगाने होणारा वाढता आकडा:
- ३ आरोपी अटकेत
- १० आरोपी सध्या तुरुंगात
- १२ आरोपी फरार
फरार आरोपींच्या यादीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे आणि माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांचे पती विनोद उर्फ पिटू गंगणे यांची नावे समोर आली आहेत. तसेच, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदाडे यांचेही नाव ड्रग्ज पेडलर म्हणून उघड झाले आहे. याचप्रमाणे नळदुर्ग गुटखा प्रकरणात जामिनावर असलेले इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर आणि संदीप संजय राठोड (दोघे रा. नळदुर्ग) यांचेही नाव ड्रग्ज प्रकरणात समोर येताच या रॅकेटचा आक्राळविक्राळ चेहरा उघड झाला आहे.
मोक्काच्या कचाट्यात गुन्हेगार का नाही?
या प्रकरणातील आरोपींपैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई का होत नाही? कायद्याचे भय संपले आहे का? ही तातडीची चौकशीची मागणी जोर धरत आहे
या गंभीर प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, तामलवाडी पोलिसांकडून तपासाची जबाबदारी काढून एसआयटीकडे सोपवण्याची मागणी होत आहे.पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे फरार आरोपी मोकाट का फिरत आहेत, याचे उत्तर कोण देणार?
ड्रग्ज रॅकेटला राजकीय पाठबळ?
या प्रकरणात भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांची नावे समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत, परंतु ड्रग्जची मुळे उखडून टाकण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे रॅकेट संपवण्यासाठी कडक पावले उचलली जाणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे.
धाराशिव जिल्ह्याला ड्रग्जमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलणार कोण?
आरोपींची संख्या वाढतच चालली आहे, परंतु तपासाच्या गतीमध्ये वेगाने होणारा विलंब कशाचा संकेत देतो? ड्रग्जसारख्या विळख्यात अडकलेल्या धाराशिवच्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी कडक उपाययोजना केव्हा केल्या जाणार?
धाराशिव लाईव्हच्या धडाकेबाज कव्हरेजनंतर उघड झालेली ही गंभीर बाब पुढे किती वाढणार? आरोपीवर कारवाई न झाल्यास हा विषारी विळखा अजून किती पसरत जाईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.