तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालला आहे. आजपर्यंत १८ आरोपींवर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यापैकी १० जण कारागृहात आहेत, दोन जण अटकेत तर सहा जण फरार आहेत. फरार आरोपींपैकी दोन जणांची नावे जाहीर झाली आहेत, परंतु उर्वरित चार नावे अद्याप गुप्त आहेत. या फरार आरोपींवर ‘लूक आऊट नोटीस’ का काढण्यात आलेली नाही? त्यांची संपत्ती जप्त का करण्यात आलेली नाही? या सर्व प्रश्नांमुळे पोलिस यंत्रणेची कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे.
पोलीस कारवाईचा गुळगुळीतपणा
ड्रग्ज पेडलर कोणाच्या छत्रछायेखाली आहेत? याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी थेट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप केला की, हे ड्रग्ज पेडलर त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. यासाठी त्यांनी काही फोटो देखील दाखवले. त्याला प्रत्युत्तर देताना माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी हे पेडलर पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये आले असे सांगितले.
गुन्हेगारांचा पक्ष किंवा धर्म नसतो, पण अशा गुन्हेगारांना कोणत्याही राजकीय नेत्यांनी आश्रय देणे म्हणजे समाजाच्या माथी कलंक लावणे आहे. अशा लोकांना पक्षाच्या ओळखीची ढाल का मिळते? हे प्रश्न समाजमनाला पोखरत आहेत. आ. राणा पाटील यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन, आपल्या समर्थकांना कायद्याच्या कचाट्यात येऊ द्यावे. नाहीतर त्यांच्या मौनामुळे संशयाचे ढग अधिक गडद होतील.
राजकीय नाट्याचा पर्दाफाश
हे प्रकरण केवळ कायद्यापुरते मर्यादित नाही, तर राजकीय घुसळणीतही अडकले आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्रीय नारकोटिक्स ब्युरोकडून तपासाची मागणी केली आहे. विधिमंडळातही ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली. मात्र, याच वेळी आ. राणा पाटील यांच्या पीएने सोशल मीडियावर पोलिसांनी दिलेले उत्तर मात्र अधिकच गोंधळ घालणारे ठरले आहे. हे उत्तर गुळगुळीत आणि संशय वाढवणारे आहे.
तपास यंत्रणांचा अविश्वास
या प्रकरणाचा तपास सध्या तामलवाडी पोलिसांकडे आहे. पण स्थानिक पोलिसांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता यावर लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. म्हणूनच, या प्रकरणाचा तपास राज्याच्या एसआयटीकडे देण्यात यावा, असा लोकांचा सूर आहे. तपासासाठी प्रामाणिक आणि कडक शिस्तीचा अधिकारी नेमल्याशिवाय लोकांच्या मनातील शंकेची पाल थांबणार नाही.
गुन्हेगारांना राजकीय कवच का?
ड्रग्ज पेडलरना राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत असेल, तर हा राज्याच्या कायद्याविरोधातील गंभीर गुन्हा आहे. कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे असेल, तर कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता, सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी. ड्रग्जसारख्या सामाजिक कर्करोगाला मुळातून उपटून टाकण्यासाठी राजकीय नेत्यांनी स्वच्छता मोहिम हाती घ्यावी. अन्यथा, राजकीय मंडळीच समाजासाठी ‘ड्रग्ज पेडलर’ म्हणून ओळखली जातील!
शासनाला कडक भूमिका घेण्याची गरज
या प्रकरणावर केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून उपयोग नाही. ड्रग्ज मुक्ती ही केवळ घोषणा न राहता ती कृतीत उतरण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी. एसआयटीद्वारे सखोल तपास करून गुन्हेगारांचा पर्दाफाश करावा. अन्यथा समाजामध्ये कायद्याविषयीचा विश्वास उद्ध्वस्त होईल.
आता वेळ आली आहे सरकारने कडक पावले उचलण्याची. ड्रग्जच्या विळख्यातून तुळजापूर मुक्त करण्यासाठी ‘जीरो टॉलरन्स’ची भूमिका घ्यायला हवी. अन्यथा, तरुणाईच्या भविष्यावर काळे ढग दाटून येतील आणि त्यांच्या आयुष्याचा नाश होईल. समाजानेदेखील जागरूक राहून, अशा विघातक प्रवृत्तींचा धिक्कार करावा.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह