तुळजापूर हे महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक पवित्र ठिकाण, देवीची कृपा लाभलेल्या या नगरीत गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्जचा खेळ पोलिसांच्या आशीर्वादाने उघडपणे सुरू होता, ही बाब नक्कीच संतापजनक आहे. धार्मिक भावनेच्या आडून या पवित्र नगरीत विकृतीचा किड लागला आहे आणि याला जबाबदार आहेत ते स्थानिक राजकीय नेते आणि पोलिस यंत्रणा!
तुळजापूरच्या मातीत जिथे भक्तीची गंगा वाहायला हवी, तिथे ड्रग्जच्या नद्या वाहू लागल्या. का? कारण या नद्यांना राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांचे पाठबळ मिळाले. तीन वर्षे या किळसवाण्या व्यवसायाची फोफावणी होत असताना पोलिसांनी डोळे मिटून घेतले होते का? का राजकीय नेत्यांनी हात वर करून आशिर्वाद दिला होता? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची वेळ आली आहे.
फरार आरोपींच्या यादीत माजी नगराध्यक्ष, माजी सभापती आणि राजकीय नेते हे मोठ्या अभिमानाने विराजमान आहेत. या नेत्यांनी जनतेचे नेतृत्व करायचे सोडून तरुण पिढीला नशेच्या दलदलीत लोटले. जबाबदार नागरिकांऐवजी हे नेते ड्रग्ज माफियांना अभय देत होते. शहराचा विकास सोडून आपल्या नफ्याचे गणित मांडण्यात हेच नेते गुंतले होते.
पोलीस, जे समाजरक्षणाचे प्रतिक आहेत, त्यांनीच या घातक व्यवहाराचे रक्षण केले. तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यासह बिट अंमलदारांवरही संशयाची सुई आहे. ड्रग्ज माफियांकडून हफ्ते घेतले जात होते का? जर पोलिसांचेच रक्षक ड्रग्ज माफियांना संरक्षण देत असतील, तर जनतेने कोणाकडे पाहावे?
तुळजापूरचे हे ड्रग्ज प्रकरण म्हणजे पोलिस आणि राजकीय नेत्यांच्या साटेलोटे राजकारणाचे विदारक दर्शन आहे. तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या माफियांना अभय देणाऱ्या नेत्यांचे नाव उघड करणे हेच आता जनतेचे कर्तव्य आहे.
राजकीय नेत्यांचे अभय मिळवून मोकाट फिरणारे ड्रग्ज माफिया आणि पोलिसांचे नाते उघड झाले आहे. तरीही हेच राजकीय नेते अजूनही मोकाट फिरत आहेत. सरकारला विचारावेसे वाटते, की मोक्क्का लागू करायला सरकारला अजून किती जनतेचा संताप पाहायचा आहे?
ड्रग्जच्या विळख्यातून तुळजापूरला सोडवायचे असेल तर भ्रष्ट नेत्यांचे आणि पोलिसांचे मुळासकट उच्चाटन करणे गरजेचे आहे. जनता आता सुजाण झाली पाहिजे आणि या माफक न्यायाच्या नाटकावर पडदा पाडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारने तात्काळ एसआयटीच्या चौकशीची मागणी मान्य करून सर्व आरोपींना मोक्क्का लावावा आणि दोषी पोलिसांना तातडीने निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत.
तुळजापूरची पवित्रता वाचवण्यासाठी आवाज उठवू या आणि नशेच्या साम्राज्याला नेस्तनाबूत करू या !
– बोरूबहाद्दर