तुळजापूर: वैद्यकीय पदवी नसतानाही लोकांवर उपचार करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरबन सुबध बिश्वास (वय १९ वर्षे) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, सलगरा दिवटी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उबेद अली सय्यद (वय २७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी सरबन बिश्वास हा जवळगा मेसाई (ता. तुळजापूर) येथे वास्तव्यास असून, तो एक मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक नसतानाही तसे भासवत होता. त्याने १८ जून २०२५ रोजी, लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही, त्यांच्यावर चुकीचे वैद्यकीय उपचार केले आणि त्याबदल्यात पैसे घेतले.
डॉ. सय्यद यांनी १९ जून २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून, तुळजापूर पोलिसांनी आरोपी सरबन बिश्वास विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११०, ३१९(२), ३१८(४) तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट १९५६ कलम १५, १५(२) आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसेस ऍक्ट १९६१ कलम ३३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.