धाराशिव – २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणी चालू असल्याबाबतचे खोटे वृत्त प्रसिध्द होत आहे.मात्र प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे.अशा कुठल्याही बोगस अथवा चुकीच्या मतदारांची नोंदणी २४१ – तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली नाही अशी माहिती तुळजापुर तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अरविंद बोळंगे यांनी दिली.
मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. साधरणत : मागील महिनाभरामध्ये २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अचानक नविन मतदार नोंदणीसाठी मोठया प्रमाणात ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहे.हे ऑनलाईन अर्ज त्या-त्या मतदार यादीभागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून पडताळणी करुनच त्यावर निर्णय घेतला जातो.
मागील महिनाभरात आलेल्या अर्जाची पडताळणी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचमार्फत सुरु आहे.नविन मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेल्या व्यक्तिचे रहिवासाचे ठिकाण,कुटूंबातील इतर व्यक्तिचे मतदार यादीत असलेले नाव व इतर पुरावे याची पडताळणी करुनच मतदार नोंदणीची अंतिम कार्यवाही केली जात आहे.अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट अथवा चुकीची आढळुन आल्यास संबंधीत जबाबदार व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अर्जदाराने चुकीची कागदपत्रे अथवा पुरावे सादर केल्याची बाब निदर्शनास येताच असे सर्व अर्ज रितसर नामंजूर केले जात आहेत. अर्जासोबत जोडलेल्या पुराव्याची पुरेपूर खात्री करूनच नविन मतदारांची नोंदणी केली जात असल्याने केवळ ऑनलाईन अर्ज केला म्हणून चुकीची अथवा बोगस नोंदणी झाली असे म्हणणे चुकीचे आहे.त्यामुळे अशा बाबींची मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे खात्री करणे आवश्यक आहे.
बनावट मतदार नोंदणी संदर्भाने कोणाचीही तक्रार असल्यास सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तुळजापूर यांचेकडे संपर्क करावा.चुकीच्या बातमीवर कोणीही विश्वास ठेवू नये.याबाबत मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तुळजापूर यांनी केले आहे.