तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील हगलूर शिवारात नवीन विद्युत डीपी बसवण्यासाठी स्थानिक वायरमन भोसले यांनी शेतकऱ्यांकडून लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये अशी एकूण ५१ हजार रुपयांची लाच भोसले यांनी घेतली आहे. बारुळ महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कांबळे यांना देण्यासाठी ही लाच घेतल्याचे भोसले यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची व्यथा
हगलूर शिवारातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येने त्रस्त होते. विद्युत डीपी वर लोड येत असल्याने विद्युत मोटारी बंद पडत होत्या. यामुळे शेतीचे कामकाज ठप्प पडले होते. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या. तक्रारींची दखल घेत महावितरणने नवीन डीपी मंजूर केला. मात्र, हा डीपी सुरू करण्यासाठी स्थानिक वायरमन भोसले यांनी शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी केली. शेतीचे कामकाज सुरू राहावे यासाठी शेतकऱ्यांनी लाच देण्यास भाग पाडले गेले.
नवीन डीपी बसला, पण सुरू नाही
लाच देऊनही शेतकऱ्यांची अडचण दूर झाली नाही. नवीन डीपी बसवण्यात आला असला तरी तो सात-आठ महिन्यांपासून सुरू करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही आणि कांबळे यांची भेट घेऊनही डीपी सुरू करण्यात आलेला नाही. भोसले यांनी डीपी सुरू करण्यासाठी आणखी २० हजार रुपये मागितल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वायरमनची बदली, पण समस्या कायम
दरम्यान, भोसले यांची बदली झाली असून पटेल हे नवीन वायरमन म्हणून रुजू झाले आहेत. पटेल यांनी ” तुम्ही पैसे भोसले यांना दिले, मला कुठे दिले ? म्हणून डीपी सुरू करण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे शेतकरी वैतागले असून आण्णासाहेब दराडे यांनी आजच्या आज डीपी सुरू न केल्यास चालू डीपीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांमध्ये संताप
शासन एकीकडे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून मोफत वीज देत असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून अशी अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वीज मिळावी यासाठी लाच द्यावी लागत असेल तर मोफत वीजेचा काय उपयोग? या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हिडीओ पाहा