तुळजापूर: तुळजापूर-सोलापूर बायपास हायवेवर स्कुटी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पतीच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी दुपारी १२.३० वाजता बालाजी नागोराव जगताप हे त्यांची पत्नी आश्विनी उत्तम जगताप यांच्यासह स्कुटी क्रमांक एमएच १३ ईएल ०५५४ वरून सिंदफळ शिवारातून जात होते. श्रेया पान शॉप समोरील गतीरोधकावर बालाजी जगताप यांनी स्कुटी हायगयी आणि निष्काळजीपणे चालवल्याने स्कुटी गतीरोधकाला जोरात धडकली. या अपघातात आश्विनी जगताप या स्कुटीवरून खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आश्विनी यांचे पती बालाजी जगताप यांच्याविरुद्ध त्यांचे वडील उत्तम नागोराव जगताप यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दि. २४ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, बालाजी जगताप यांच्यावर भादंवि कलम २८१, १२५(ए), १२५(बी) आणि १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरू आहे.