तुळजापूर – गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांची चमडी वाहतूक करताना तुळजापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही कारवाई तुळजापूर-सोलापूर रोडवरील सिंदफळ बायपासजवळील काका ढाब्यासमोर 11 मार्च रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अखिल पडसलगीर (33, रा. नई जिंदगी, सोलापूर), अजहर गुलामबाई शेख (23, रा. विजापूर बेस, सोलापूर), माजीद सत्तार शेख (35, रा. बेगमपेठ, सोलापूर), ब्रुद्रुक अब्दुल जब्बार गुंजेगाव (62, रा. बेगमपेठ, सोलापूर) आणि गफार करीम शेख (51, रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) हे आयशर टेम्पो (क्रमांक MH 13 AX 9387) मधून 4.5 टन गोवंशीय जनावरांची चमडी अवैधरीत्या वाहतूक करताना आढळले.
याबाबत पशुवैद्यकीय विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोपींनी गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून चमडी विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत 4,99,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियमातील कलम 5 (क) व 9 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.
वाशीमध्ये निर्दयपणे जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल
वाशी – निर्दयपणे आणि बेकायदेशीररित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना वाशी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एनएच-52 महामार्गावर पार्डी फाटा येथे 12 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम जिजाराम साळवे (34, रा. आंबेडकर नगर, राशिन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा बोलेरो पिकअप (क्रमांक MH 45 T 3340) मधून 39 जीवंत वासरे, 4 मृत वासरे, एक रेडकू आणि एक मृत रेडकू अशा एकूण 43 जनावरांची निर्दयतेने वाहतूक करताना आढळला.
वाहनात जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा नव्हती तसेच त्यांना अन्न-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनासह एकूण 3,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कलम 11(1), 11(1)(ए), 11(1)(एफ), 11(1)(एच), 11(1)(आय) तसेच प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम 5(अ), 5(ब), 9, 11 आणि प्राण्यांच्या परिवहन नियमावलीतील कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.