तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय पट आता अक्षरशः धगधगतो आहे. कारण तेथे एकेकाळी धोतरवाल्यांचा गड होता, पण आता पॅन्टवाल्यांनी तेथे कब्जा केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी पॅन्ट घालून धोतरवाल्यांची परंपरा खंडित केली होती. पण आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा धोतरवाल्यांचा पुकारा होतोय.
९० वर्षांचे तरतरीत मधुकरराव चव्हाण, ज्यांनी मागील दोन निवडणुकांमध्ये “ही माझी शेवटची निवडणूक” असे सांगूनही निवृत्त होण्याऐवजी मतदारांनी त्यांना निवृत्त केले, आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. “माझं धोतर अजूनही इस्त्री केलेलं आहे,” असं म्हणत चव्हाणसाहेब निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
धोतर परंपरेचा इतिहासही मोठा रोचक आहे. १९६२ पासून साहेबराव हँगरगेकरांनी धोतर घालून आपली हुकुमत प्रस्थापित केली, त्यानंतर शिवाजीराव बाभळगावकर, माणिकराव खपले, सिद्रामप्पा आलुरे आणि अखेर मधुकरराव चव्हाण यांनी धोतराला गडबडू दिलं नाही. पण मग आलं २०१९ आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी धोतरला बाजूला करून पॅन्ट परिधान केली.
या बदललेल्या राजकीय फॅशनचा परिणाम असा झाला की धोतरवाले आता पुन्हा एकदा धोतर कसून बांधत आहेत. चव्हाणसाहेबांना मतदारांना पटवून द्यायचं आहे की धोतर हा फक्त परिधान नसून एक परंपरा आहे, एक सांस्कृतिक धरोहर आहे.
आता प्रश्न हा आहे की, २०२४ च्या निवडणुकीत मतदार धोतरवाल्यांचा विचार करतील की पॅन्टवाल्यांना पुन्हा संधी देतील? मतदारसंघात सध्या चर्चेला वेग आला आहे – “धोतरवाल्यांचा विजय होणार की पॅन्टवाल्यांचं पॅटर्न टिकणार?”
धोतर अन पॅन्टची आता शर्यत भारी,
चव्हाण की राणा, कुणाची होईल सवारी?
परंपरेची लढाई की विकासाचं स्वप्न,
तुळजापुरात मतदार ठरवतील अंतिम सत्य!– बोरूबहाद्दर