धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि लुटीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तुळजापूर येथे एका व्यक्तीला मारहाण करून १ लाख रुपये हिसकावल्याची घटना घडली, तर कळंब येथे एका घरातून सुमारे अडीच लाखांचे दागिने लंपास झाले आहेत. दोन्ही घटना ७ मे २०२५ रोजी उघडकीस आल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुळजापुरात १ लाखाची रोकड लुटली
तुळजापूर शहरातील विश्वनाथ कॉर्नरजवळ ७ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सुनिल सुखदेव लोंढे (वय ५६ वर्षे, रा. मोतीझरा विभाग, हाडको स्मशानभूमी रोड, तुळजापूर) यांनी एसबीआय बँकेतून १ लाख रुपये काढून आपल्या बॅगेत ठेवले होते. ते विश्वनाथ कॉर्नर जवळून जात असताना आरोपी बी. जिवारथीनम (रा. चेन्नई, तामिळनाडू) याने लोंढे यांच्या पायावर लाथ मारली आणि त्यांच्या हातातील पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सुनिल लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी बी. जिवारथीनम विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कळंबमध्ये सव्वा दोन लाखांची घरफोडी
कळंब तालुक्यातील खडकी येथे ५ मे २०२५ रोजी रात्री ११.३० ते ६ मे २०२५ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घरफोडीची घटना घडली. फिर्यादी रमेश खुब्राव परळकर (वय ५७ वर्षे, रा. खडकी) यांच्या राहत्या घराची कडी अज्ञात चोरट्याने काढून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४७ हजार २७५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रमेश परळकर यांनी ७ मे २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.