तुळजापूर: तुळजापूर शहराला हादरवून सोडलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (बापू) कणे यांचा भाचा आबासाहेब पवार याला अटक केली आहे. सेवन गटातील संशयित आरोपी असलेल्या पवार यास पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १७ मे) रात्री उशिरा अटक केली. त्याला पुढील तपासासाठी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अटकेमुळे प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १७ झाली असून, अजूनही १९ आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी २६ जणांचा विक्री गटात तर १० जणांचा सेवन अर्थात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांच्या गटात समावेश आहे. आबासाहेब पवार हा सेवन गटातील आरोपी असून, तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत त्याला पुण्यातून जेरबंद केले.
गेल्या दीड महिन्यांपासून अनेक आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. गेल्या दोन दिवसांत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी, माजी सभापती शरद जमदाडे यांनाही अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे फरार असलेल्या इतर आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख आणि तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक करत आहेत. या प्रकरणी यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले आहे.
प्रकरणातील सद्यस्थिती:
- एकूण निष्पन्न आरोपी: ३६
- अटक झालेले आरोपी: १७ (यामध्ये १५ आरोपी जेलमध्ये असून, नव्याने अटक झालेल्या पवार आणि त्यापूर्वी जमदाडे यांचा समावेश आहे)
- फरार आरोपी: १९
- विक्री गट आरोपी: २६
- सेवन गट आरोपी: १०
तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्री एमडी ड्रग्जचे एवढे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींच्या जवळच्या लोकांची नावे समोर आल्याने तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस यंत्रणा फरार आरोपींचा कसून शोध घेत असून, या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.