तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजापूर येथे २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, भाविकांना उत्तम सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव ‘स्वच्छता संकल्पनेवर’ आधारित असेल, असे जिल्हाधिकारी पुजार यांनी बैठकीत स्पष्ट केले. ते म्हणाले, “देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक सुखरूप घरी जाईपर्यंत त्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
परंपरेनुसार, २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होऊन महोत्सवाला सुरुवात होईल, तर त्याआधी १४ सप्टेंबर रोजी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने विविध आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे.
विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या प्रमुख सोयीसुविधा:
- रस्ते आणि वीजपुरवठा: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहराकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या सोयीसाठी मराठी, कन्नड आणि तेलगू भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. तसेच, विद्युत विभागाकडून संपूर्ण नवरात्र काळात २४ तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला जाईल.
- आरोग्यसेवा: भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहराच्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, साथरोग नियंत्रण पथके आणि १० बाईक ॲम्ब्युलन्स तात्काळ सेवेसाठी सज्ज असतील.
- स्वच्छता आणि नागरी सुविधा: नगर परिषदेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ३ ठिकाणी विश्रांतीगृहे, अग्निशमन वाहन आणि वॉच टॉवर उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- सुरक्षितता: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात १०२ ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून, २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथकेही कार्यरत असतील.
- अन्न सुरक्षा: अन्न व औषध प्रशासन विभागाचे २० अन्न सुरक्षा अधिकारी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर काटेकोरपणे देखरेख ठेवणार आहेत.
सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
यावर्षीपासून शारदीय नवरात्र महोत्सवात प्रशासनाच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या नवीन उपक्रमाचे भोपे पुजारी मंडळाने स्वागत करत जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक माया माने, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व इतर पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.