तुळजापूर: तालुक्यातील आपसिंगा येथे एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव मयुरी सुरज गुरव (वय २५) असे असून तिने ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती सुरज गुरव, जाऊ धनश्री गुरव आणि दीर धीरज गुरव यांच्यासह सासू छाया गुरव यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुरीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरजचे त्याची जाऊ धनश्री हिच्याशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार मयुरीने माहेरच्यांना सांगितल्याने आणि प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने तिला सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून मयुरीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
पोलिसांनी मयुरीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भा.न्या.सं.कलम- 108, 80,85 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.