तुळजापूर – तीर्थक्षेत्र तुळजापूर पुन्हा एकदा अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडले असून, शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उशिरा ‘मलबा हाईट्स’ लॉजवर केलेल्या धडक कारवाईत एका हायप्रोफाईल ऑनलाइन मटका अड्ड्याचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, या मटका साम्राज्याचे सूत्रधार चक्क स्वतःला भावी नगरसेवक म्हणवणारे काँग्रेसचे अमोल कुतवळ (ज्याची ओळख ‘अमर-अकबर-अँथनी’ अशीही आहे), भाजपचे बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील आणि भाजपचेच विनोद गंगणे असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण तुळजापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असा लागला सुगावा, अशी झाली कारवाई
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मलबा हाईटसमधील साठे नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये कल्याण आणि मिलन मटक्याचे आकडे व्हॉट्सॲपद्वारे घेऊन ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची पक्की खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री दहा वाजता छापा टाकला. यावेळी विक्रम दिलीप नाईकवाडी (वय ३१), विकास बाबुराव दिवटे (वय ३०), रविंद्र बळीराम ढवळे (वय २८) आणि निलेश आप्पासाहेब तेलंग (वय २९) हे चार इसम मटका खेळताना आणि खेळवताना रंगेहाथ सापडले.
चौकशीत उघड झाले ‘मटका किंग’चे मालक!
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विक्रम नाईकवाडी याची कसून चौकशी केली असता, त्याने धक्कादायक माहिती दिली. हा मटका अड्डा आपण स्वतः, काँग्रेसचे अमोल माधवराव कुतवळ (रा. रावळ गल्ली), भाजपचे सचिन पाटील (रा. रावळ गल्ली), भाजपचे विनोद विलास गंगणे (रा. जिजामाता नगर) आणि भाजपचेच चैतन्य मोहनराव शिंदे (रा. शुक्रवार पेठ) हे सर्वजण मिळून चालवत असल्याची कबुली त्याने दिली. हे सर्वजण या मटका बुकीचे मालक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एजंटांचे मोठे जाळे आणि आंतरजिल्हा कनेक्शन
या रॅकेटमध्ये कमिशनवर काम करणाऱ्या एजंटांची मोठी फौज असल्याचेही उघड झाले आहे. यामध्ये राम मांगडे, विजय निंबाळकर, ज्ञानेश्वर जाधव, संतोष जगताप, मोहन मोहरकर, कृष्णा काळे, मिथुन पोकळे, अजाज शेख, राम हरी मस्के, हसन नाईकवाडी, संतोष रोकडे, कुलदिप गरड, अक्षय खराडे, गाढवे सर, विंकी पोकळे, सुभाष पारवे, सागर शिंदे, शुभम क्षिरसागर, अंबादास राशीनकर, श्रावण जाधव आणि जिवन बोबडे यांचा समावेश आहे. हे एजंट व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे मटक्याचे आकडे आणि पैसे गोळा करत होते. इतकेच नव्हे तर, या टोळीचे धागेदोरे सांगोला, मोहोळ आणि वडाळा येथील फिरत्या एजंटपर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशपाक खलील मुलानी, गणेश बापुसाहेब देशमुख आणि तात्या कदम हे या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे.
राजकीय लागेबांधे असलेले सूत्रधार
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचे राजकीय पक्षांशी असलेले संबंध अत्यंत गंभीर आहेत:
- अमोल कुतवळ: काँग्रेस (नगरसेवकपदाचा इच्छुक)
- सचिन पाटील: भाजप (बाजार समितीचे माजी सभापती)
- विनोद गंगणे: भाजप
- चैतन्य मोहनराव शिंदे: भाजप
पोलिसांची कठोर भूमिका, अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणी ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर, कॅल्क्युलेटर, रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात जुगाराच्या हिशोबाची नोंद असलेली रजिस्टर्स आणि कागदपत्रे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तुळजापूरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे.