तुळजापूर: घरासमोर गाड्या लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबावर लोखंडी कोयता आणि विटांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळपाटी येथे घडली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण करण्यासोबतच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी रविवारी (दि. ८ मार्च) तुळजापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि हत्यार कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ मार्च २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास हंगरगा तुळपाटी (ता. तुळजापूर) येथे घडली. याप्रकरणी अमोल विजय लोंढे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे.
घरासमोर गाड्या लावण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर फिर्यादी अमोल लोंढे यांच्यासह त्यांचे वडील विजय लोंढे, महेश लोंढे, बायडाबाई लोंढे, अश्विनी लोंढे आणि हेमा लोंढे यांना आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली. जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने आणि विटांनी मारहाण करून लोंढे कुटुंबीयांना गंभीर जखमी केले. तसेच, जिवे मारण्याची धमकीही दिली.
या आरोपींवर गुन्हा दाखल:
अमोल लोंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून खालील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
दत्तात्रय मुरलीधर देशमुख
-
कौसा दत्तात्रय देशमुख
-
दादासाहेब दत्तात्रय देशमुख
-
शैला दत्तात्रय देशमुख
-
रतन साळुंखे (सर्व रा. हंगरगा तुळपाटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
तुळजापूर पोलीस ठाण्यात या आरोपींवर भारतीय न्याय संहितेची (भा.न्या.सं.) कलमे 109, 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 191(3) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अॅट्रॉसिटी) कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हीए) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






