तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गाजलेल्या सत्तार यासिन इनामदार खून प्रकरणात तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर न केल्याने जामीन मिळाला होता, ज्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदफळ येथे काही महिन्यांपूर्वी सत्तार यासिन इनामदार यांची हत्या झाली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांच्याकडे होता. कायद्यानुसार, अटकेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, तपास अधिकारी म्हणून नरवडे यांनी वेळेत दोषारोपपत्र सादर केले नाही.
याच तांत्रिक चुकीचा फायदा घेत आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेवर दाखल न झाल्याच्या कारणावरून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.या घडामोडीनंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. तपास अधिकाऱ्याच्या या चुकीमुळे आरोपींना एक प्रकारे मदतच झाल्याचे दिसून येत आहे.
सिंदफळ येथील सत्तार यासीन इनामदार यांच्या हत्येप्रकरणी तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपींना मदत करण्याच्या हेतूने नरवडे यांनी तपासात हेतुपुरस्सर दिरंगाई करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात वसीम गफूर इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती.
हे वाचा — वर्दीतील गद्दारी आणि विकलेला न्याय!
दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गुन्ह्यातील आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी तपास अधिकारी नरवडे यांनी जाणीवपूर्वक आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने ‘नो से’ (No Say) आदेश दिला. तसेच, वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर झाला. जर तपास अधिकाऱ्यांनी वेळेवर दोषारोपपत्र दाखल केले असते, तर आरोपींना जामीन मिळाला नसता, असे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.