तुळजापूर: तुळजापूर शहरात गेल्या काही महिन्यापासून विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे. मटका, जुगार, ड्रग्ज, गुटखा विक्री, अवैध वाहतूक अशा अनेक प्रकारांचा यात समावेश आहे. या धंद्यांना आळा घालण्याऐवजी पोलिसांचाच त्यांना पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
राजाभाऊ माने यांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, तुळजापूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर , आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) अधिकारी वासुदेव मोरे यांच्या आशिर्वादाने हे अवैध धंदे सुरू आहेत. माने यांनी या अधिकाऱ्यांवर हप्ते घेतल्याचे आरोपही केले आहेत.
पोलिसांच्या संगनमताचे पुरावे सादर
या तक्रारीची चौकशी करण्यासाठी माने यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. माने यांनी आपला जबाब नोंदवला असून, या अवैध धंद्यांचे पुरावेही सादर केले आहेत. यामध्ये काही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.
शहराच्या प्रतिमेला धक्का
तुळजापूर हे एक धार्मिक पर्यटन स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. या अवैध धंद्यांमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून, भाविकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांवर कारवाईची मागणी
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास, उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा माने यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.