तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरु आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे, दुसरीकडे या गर्दीत काही चोरी करणाऱ्या महिला शिरल्या असून, दररोज चोरीच्या घटना घडत आहेत.
रविवारी, ७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मंदिराच्या शहाजी महाद्वारासमोर जबरी चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. फिर्यादी बेदी सचिन चव्हाण (वय २१, राहणार मुसाळी लमाण तांडा, ता. देवहिप्परगी, जि. विजापुर) यांनी या घटनेची तक्रार तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
फिर्यादी बेदी सचिन चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. देवदर्शन आटोपून ते मंदिराबाहेर शहाजी महाद्वाराजवळ आले असता, आरोपी काजल शंकर भोसले (वय ३०, राहणार एस क्लब जवळ, छत्रपती संभाजीनगर) या महिलेने त्यांना धक्का देऊन त्यांच्या बाळाच्या पायातील दोन चांदीच्या वाळ्यांची जबरदस्तीने चोरी केली. चोरी झालेल्या चांदीच्या वाळ्यांची किंमत अंदाजे ३,५०० रुपये आहे.याप्रकरणी आरोपी काजल शंकर भोसले ( वय ३० वर्षे ) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये चोरी करणाऱ्या काही महिलाचे फोटो संग्रही आहेत. सीसीटीव्हीमध्ये या चोर महिला दिसत असल्या तरी पोलिसांच्या हाती त्या लागत नाहीत. त्यामुळे या चोर महिला आणि पोलिसांचे हितसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे.