तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गट क्रमांक १७६ च्या शेतीच्या जमिनीच्या बिगरशेती आदेशाचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. दोन तहसीलदारांनी या जमिनीसाठी दोन वेगवेगळे बिगरशेती आदेश पारित केल्याचे आढळून आल्यानंतर तहसीलदार अरविंद बोंळगे यांनी जमीन खरेदीदार आणि विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, जमीन खरेदीदाराचे पती गिरवरसिंग सुखमणी यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंदफळ येथील गट नंबर १७६ चा बिगरशेती आदेश हा तहसीलमधील एका एजंट आणि अधिकाऱ्याने मिळून करून दिला आहे. सुखमणी यांनी या एजंट आणि अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाइंडला शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, संबंधितांना अटक करण्यासाठी पथके तयार केली आहेत. दोन दिवसांत या प्रकरणी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणामुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तुळजापूर आणि धाराशिव तहसील कार्यालयात काळे कारनामे करणारे काही लिपिक बसले आहेत. काही दलाल आहेत. त्यांनीच हा बोगस एन, ए. ले आऊट करून शासनाची आणि लोकांची फसवणूक केली आहे. काळे कारनामे करणारे हे लिपिक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.