तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या १०८ फुटी कांस्य मूर्तीच्या स्वरूपावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आता अधिकृत कागदपत्रांमुळे नवे वळण मिळाले आहे. मूर्ती द्विभुजा असावी की अष्टभुजा, यावर लोकप्रतिनिधींमध्ये कलगीतुरा रंगला असताना, खुद्द श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने शिल्पकारांसाठी जारी केलेल्या परिपत्रकात देवीचे रूप ‘अष्टभुजा’ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, इतिहासकारांनी या शिल्परचनेबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिल्याने आता वादाचा रोख देवीच्या हातांऐवजी तिच्या आशीर्वादाच्या स्वरूपाकडे वळण्याची शक्यता आहे.
प्रकल्प नेमका काय?
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने “श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देतानाच्या प्रसंगावर आधारित” १०८ फूट उंचीच्या कांस्य शिल्पासाठी नियोजन सुरू केले आहे. या शिल्पाच्या निर्मितीपूर्वी, देशभरातील शिल्पकारांकडून २.५ ते ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल (Maquette) मागवण्यात आले आहेत. हे मॉडेल सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ असून, ते मुंबईतील कला संचालनालयात स्वीकारले जातील अंतिम निवड झालेल्या मॉडेलच्या शिल्पकारास १० लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.
अष्टभुजा की द्विभुजा? वादावर पडदा?
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देवीच्या अष्टभुजा संकल्पचित्रावर आक्षेप घेत ते संकेतस्थळावरून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंदिर संस्थानाने शिल्पकारांना दिलेल्या माहितीसोबत जोडलेल्या ऐतिहासिक संदर्भांनुसार, देवीचे मूळ रूप हे अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असल्याचे स्पष्ट होते.
- ऐतिहासिक पुरावे: संस्थनाने प्रसिद्ध लेखक रा. चिं. ढेरे, दत्तात्रय कुलकर्णी-जोशी आणि गणेश हरी खरे यांच्या पुस्तकांतील वर्णने जोडली आहेत. या तिन्ही संदर्भांमध्ये तुळजापूरची मुख्य मूर्ती ‘अष्टभुजा’ असल्याचे निःसंदिग्धपणे नमूद केले आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शेंडी असल्याचे वर्णन आहे.
- अधिकृत सूचना: शिल्पकारांना मॉडेल बनवताना याच ऐतिहासिक संदर्भांचा विचार करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
वादाला नवे वळण: तलवार कोणाच्या हाती?
एकीकडे देवीच्या हातांची संख्या निश्चित होत असताना, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शिल्पाच्या मूळ संकल्पनेवरच मोलाचा सल्ला दिला आहे. या प्रकल्पासाठी ऐतिहासिक संदर्भ देण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले होते.
बलकवडे यांच्या मते, “तुळजाभवानी मातेने शिवाजी महाराजांना आशीर्वाद देते समयी त्यांच्या तलवारीमध्ये प्रवेश केला,” अशी तमाम मराठी बांधवांची आणि दोन्ही छत्रपती घराण्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे, देवी प्रत्यक्ष तलवार देत असल्याचे दाखवण्याऐवजी, “तलवार शिवाजी महाराजांच्या हातामध्ये असणे जास्त संयुक्तिक आहे,” असे मत त्यांनी मांडले आहे. हा सल्ला स्वीकारल्यास, शिल्पाची रचना आशीर्वाद देण्याच्या प्रसंगावर केंद्रित होईल.
थोडक्यात, राजकीय वादामुळे चर्चेत आलेली देवीच्या हातांची संख्या आता अधिकृत संदर्भांमुळे ‘आठ’ असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आता खरा विचारप्रवाह हा देवीने तलवार ‘देताना’ दाखवावी की आशीर्वाद देताना महाराज ‘उभे’ दाखवावेत, यावर सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढे राजकीय भूमिका आणि कलात्मक अविष्कारात ऐतिहासिक संदर्भ किती महत्त्वाचे ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.