तुळजापूर – धाराशिव-तुळजापूर महामार्गावर बोरी गावाजवळ उभ्या असलेल्या गुजरात पासिंगच्या एका स्विफ्ट डिझायर कारसह त्यामधील लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नितेशभाई निरुभाई पाडवी (वय ३२, रा. बोरीकुअँ ता.कुकर मुंडा जि. तापी राज्य गुजरात) हे आपल्या कारने प्रवास करत होते. १९ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४ ते ४ वाजून ५ मिनिटांच्या दरम्यान ते धाराशिव ते तुळजापूर जाणाऱ्या रोडवर बोरी गावाच्या समोर थांबले होते.
यावेळी नितेशभाई पाडवी यांनी आपली स्विफ्ट डिझायर कार (क्र. जी.जे.१५ ए.डी. २९४१) रोडच्या कडेला उभी केली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली. कारसह त्यामधील मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि रोख रक्कम १,००० रुपये असा एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
आपली कार व त्यातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नितेशभाई पाडवी यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.