तुळजापूर: तहसीलदार हे तालुक्याचे दंडाधिकारी असून, जमीनीच्या वादविवाद प्रकरणांची सुनावणी करण्याचे अधिकृत अधिकार त्यांच्याकडे असतात. मात्र, तहसील कार्यालयात नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सिंदफळ गावातील जमिनीच्या वादाच्या सुनावणीदरम्यान तहसीलदारांच्या शेजारी असलेल्या नायब तहसीलदारांच्या खुर्चीवर एक खासगी दलाल बसलेली आढळली. या घटनेने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले आहेत. तहसील कार्यालयातील अधिकृत खुर्चीवर खासगी व्यक्ती बसण्याचा अधिकार कोणी दिला? प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन नाराजी व्यक्त केली. हा प्रकार गंभीर असून प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती हा तुळजापूर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दलाल असून, लोकांकडून पैसे उकळून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असल्याचे समजते.
तहसील कार्यालयात अशा प्रकारचे प्रकार होणे तालुक्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तहसीलदार अरविंद बोळंगे म्हणाले, “तहसील कार्यालय हे सार्वजनिक ऑफिस आहे. जर कोणी खासगी व्यक्ती खुर्चीवर बसला तर त्याला उठायला सांगणे अवघड आहे.” या विधानामुळे अनेकांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजापूर तहसील कार्यालयात खासगी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. जमिनीच्या प्रकरणात हे दलाल मध्यस्थी करीत असल्याची चर्चा आहे. सिंदफळच्या बोगस एन ए / लेआऊट प्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना यातून अधिकऱ्यानी धडा घेतल्याचे दिसत नाही.