परंडा: परंडा तालुक्यातील करंजा येथे शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळू चोरी प्रकरणी कारवाई करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दुर्गाप्पा तुकाराम पवार हे मंडळ अधिकारी म्हणून महसूल विभाग, तहसील कार्यालय परंडा येथे कार्यरत आहेत. दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजता ते करंजाकडे जात असताना त्यांना नागनाथ मारुती डाकवाले आणि नागनाथ जयसिंग नरसाळे हे दोघे आरोपी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू चोरी करून नेताना आढळले.
पवार यांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टर आणि वाळू पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी पवार यांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०९, १३२, १२१ (१), ३०३(२), ३५२, ३५१(३), ३(५) सह कलम २१ (१)(२) खाण व खनिज अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.