तुळजापूर: श्री तुळजाभवानीच्या दरबारात स्वच्छतेचा जागर करत मंदिर प्रशासनाने एक धाडसी पाऊल उचलले आहे. मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या ८ पुजाऱ्यांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या या “स्वच्छता अभियानाचे” सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण?
मागील काही काळापासून मंदिर परिसरात काही पुजारी तंबाखू खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छतेला बाधा येत होती. यावर उपाय म्हणून मंदिर संस्थानाने संबंधित पुजाऱ्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता.
माफीनाम्यानंतरही कारवाई!
नोटिशीला उत्तर देत ६ पुजाऱ्यांनी आपला गुन्हा कबूल करत माफीनामा सादर केला. मात्र, मंदिराच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांनाही सोडण्यात आले नाही. या ६ जणांवर एका महिन्यासाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
- लखन रोहिदास भोसले
- अक्षय किशोर कदम-भैय्ये
- विशाल हनुमंत चव्हाण
- धीरज राजू चोपदार
- वैभव खुशालराव भोसले
- राहुल हनुमंत पवार
‘नो रिप्लाय’, तर ३ महिने बंदी!
तर दुसरीकडे, विशाल दादासाहेब मगर आणि विशाल बाळासाहेब गंगणे या दोन पुजाऱ्यांनी मंदिर प्रशासनाच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली. कोणताही खुलासा किंवा माफीनामा सादर न केल्याने त्यांच्यावर थेट तीन महिन्यांची प्रवेशबंदी लादण्यात आली आहे.
कायद्याचा बडगा
मंदिर प्रशासनाने ही कारवाई ‘देऊळ कवायत कायदा १९०९’ मधील कलम २४ व २५ नुसार केली आहे. या पुजाऱ्यांचे वर्तन अशोभनीय, मंदिराच्या शिस्तीस बाधा आणणारे आणि कायदा-सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे ठरवण्यात आले आहे.
एकंदरीत, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे आतातरी पुजारी आणि भाविक मंदिराच्या स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.