तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात मागील काही दिवसांपासून संशयास्पदरीत्या वावरत असल्याच्या कारणावरून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेले मुस्लिम कुटुंब हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब – ज्यात पती-पत्नी, त्यांच्या तीन मुली आणि दोन मुले यांचा समावेश होता – मागील तीन दिवसांपासून मंदिर परिसरात फिरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना शुक्रवारी (दिनांक २७ रोजी) सायंकाळी सुमारे पाच वाजता ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, या कुटुंबाने आपण श्रद्धेपोटी तुळजापुरात थांबलो असल्याचे सांगितले. ते मंगळवेढ्याचे रहिवासी असल्याचेही निष्पन्न झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले की, “चौकशीत त्यांची ओळख पटली असून ते मंगळवेढ्याचे आहेत. त्यांच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू किंवा संशयास्पद हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना चौकशी पूर्ण करून सोडून देण्यात आले आहे.”
जरी या विशिष्ट प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसली तरी, पहलग्राम (Pahalgam) येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, मंदिर परिसरात प्रशासनाने आणि सुरक्षा यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.