धाराशिव: आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं! पण सध्या तुळजापुरात भवानीच्या विकासापेक्षा राजकारण्यांच्या श्रेयवादाचाच गजर मोठा झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या रथाचे सारथ्य कोण करणार, यावरून खासदार ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) आणि आमदार राणा पाटील (भाजप) यांच्यात असा काही राजकीय कलगीतुरा रंगलाय की, विकासाचा मूळ मुद्दाच धुरळ्यात हरवून गेला आहे. त्यातच एका जुन्या व्हिडिओ बॉम्बने या वादात नवा स्फोट घडवला असून, मुंबईतील बैठकीच्या ‘राजकीय हायजॅक’ने तर या नाट्याला वेगळीच उंची गाठून दिली आहे.
पिक्चर एक: ‘व्हिडिओ’चा खेळ अन् आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
राजकारणाच्या या आखाड्यात पहिला डाव टाकला तो खासदार ओमराजे निंबाळकर यांनी. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदार राणा पाटील यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला, ज्यात राणा पाटील स्वतः श्री तुळजाभवानी मंदिराचे शिखर उतरवण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत होते. हा ‘व्हिडिओ बॉम्ब’ पडताच भाजपच्या गोटात खळबळ उडाली.
पण, राणा पाटील यांनी स्वतः मैदानात न उतरता आपल्या ‘फिल्डर’ला पुढे केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी धावत-पळत पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ ‘अर्धवट’ असल्याचा दावा केला. “ASI च्या अहवालानंतर निर्णय घेऊ, असं राणादादा म्हणाले होते, तो भाग सोयीस्करपणे कापला,” असा बचाव त्यांनी केला. मात्र, या सारवासारवीमुळे ‘राणा पाटील पुन्हा एकदा तोंडावर पडले’ अशीच चर्चा सुरू झाली.
पिक्चर दोन: मुंबईतील बैठकीचा ‘सिक्रेट शो’
एकीकडे व्हिडिओचा वाद पेटलेला असताना, दुसरीकडे मुंबईत होणाऱ्या विकास आराखडा बैठकीचे नाट्य रंगलं होतं. या महत्त्वाच्या बैठकीतून जिल्ह्याचे खासदार ओमराजे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, आधी वगळले, मग बातमीच्या दबावानंतर समावेश केला आणि आता ऐन बैठकीच्या आदल्या दिवशी पुन्हा दोघांनाही ‘गेट आऊट’ केलं गेलं.
नवीन निमंत्रण पत्रिकेत आमदार राणा पाटील यांचं नाव पहिल्या क्रमांकावर झळकत होतं, पण खासदार आणि पालकमंत्र्यांची नावे गायब होती. इतकेच नाही, तर बैठकीची वेळ आणि ठिकाणही ऐनवेळी बदलण्यात आले. मंत्रालयातून बैठक थेट प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हलवली गेली. या ‘राजकीय हायजॅक’मागे राणा पाटील यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर दबाव टाकल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
‘कल आज और कल’: कालचे ‘शिखर पाडा’ आज ‘अफवा’ कसे झाले?
विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी मंदिराच्या शिखराबद्दल काळजी व्यक्त करणारे राणा पाटील, आता मात्र ही सर्व चर्चा ‘अफवा’ आणि ‘षडयंत्र’ असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या ‘यू-टर्न’मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर शिखर पाडण्याचा विचारच नव्हता, तर मग इतके दिवस शांत का बसलात? आणि आता विरोध होताच ‘अफवा’ कशी आठवली?
एकंदरीत, आई तुळजाभवानीच्या विकासाचा आराखडा आता पूर्णपणे राजकीय श्रेयवादाच्या चिखलात रुतला आहे. एकीकडे विकासाचा आराखडा आणि दुसरीकडे श्रेयवादाचा आखाडा… यात आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास होणार की राजकारण्यांच्या कुरघोड्यांचाच कळस गाठला जाणार, याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.