धाराशिव: तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार वादात, ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीनंतर मोठी घडामोड घडली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, अखेर यादीत बदल करण्यात आला आहे. आता या दोघांनाही बैठकीचे अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, तुळजाभवानी देवी मंदिर जीर्णोद्धाराबाबतची आढावा बैठक सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबईतील मंत्रालयात होणार आहे. या बैठकीसाठी आता सुधारित निमंत्रितांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


सुधारित यादीतील प्रमुख निमंत्रित:
‘धाराशिव लाइव्ह’ने बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वीच्या यादीत केवळ आमदार राणा पाटील, जिल्हाधिकारी आणि पुजारी यांचाच समावेश होता. मात्र, आता मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत यादीनुसार खालील प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे:
- पालकमंत्री प्रताप सरनाईक (धाराशिव )
- खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव )
- आमदार राणाजगजितसिंह पाटील ( तुळजापूर )
- सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
- किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर
- पुरातत्व संचालनालय आणि ASI चे संचालक व अधिकारी
- श्रीमती तेजस्वी अफाळे, वास्तुविशारद
- विविध मठांचे महंत आणि पुजारी
यापूर्वी पालकमंत्री आणि खासदारांना वगळल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता आणि आमदार राणा पाटील यांना झुकते माप दिले जात असल्याची चर्चा होती. मात्र, बातमीच्या इम्पॅक्टनंतर आता सर्व प्रमुख संबंधितांना बैठकीत स्थान देण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी या प्रकरणातून महायुतीतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आता १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि जीर्णोद्धाराबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर वाद चिघळला! शेलारांनी बोलावली बैठक, पण पालकमंत्री सरनाईकांनाच निमंत्रण नाही

