तुळजापूर – तुळजापूर येथे 15 ते 30 ऑक्टोंबर या कालावघीत श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे.या कालावधीत तुळजापूर शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्थेत नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी शहरात सर्व प्रकारच्या मद्यविक्री, अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 15 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना, 23 ऑक्टोंबर रोजी होमावर धार्मिक विधी आणि 28 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. यादिवशी शहरात सर्व प्रकारच्या मद्यविक्री, अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
धार्मिक विधीचे वेळापत्रक
- 6 ऑक्टोबर : तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे.
- 15 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्री छबीना
- 16 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
- 17 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
- 18 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना
- 19 ऑक्टोबर : “ललिता पंचमी” देवीची पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 20 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 21 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 22 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 3 वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, रात्री 8.10 वाजता पुर्णाहुती, रात्री छबीना
- 23 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक
- 24 ऑक्टोबर : विजयादशमी (दसरा) उषःकाली देवीची शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
- 28 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा
- 29 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा
- 30 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबीना.