तुळजापूर -महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नवरात्रोत्सवासाठी यंदा १४ लाख भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर आज शुक्रवार (१३ ऑक्टोबर) पासून भाविकांसाठी २२ तास खुले असणार आहे.
तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास रविवारी प्रारंभ होत आहे. आश्विन पौर्णिमा – ३० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या नवरात्र महोत्सवात प्रचंड गर्दीत भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले असणार आहे. या कालावधीत पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजेने मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार, तर रात्री ११ वाजता प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान पार्किंग, वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत
धाराशिव रस्त्यावर हडको मैदान, आठवडा बाजार, टेलिफोन ऑफिसच्या पाठीमागे, १२४ भक्तनिवाससमोर आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अपसिंगा रोड, नळदुर्ग रोडवर नावंदर मैदान व तालुका क्रीडा संकुल आदी ठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत मंदिरात सोललेले नारळ व तेल नेण्यास बंदी असेल. त्यामुळे या वस्तूच्या विक्रीसही मनाई केली आहे. मंदिरात फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून भाविकांना घाटशीळ रोड वाहनतळमार्गे मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे, तर राजमाता जिजाऊ महाद्वार व मातंगी मंदिर मार्गे बाहेर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सशुल्क दर्शनासाठी २०० ऐवजी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.
भवानी ज्योतीसाठी असे असेल नियोजन
भवानी ज्योतीसाठी नवरात्र उत्सव मंडळाची प्रचंड गर्दी ध्यानात घेऊन प्रशासनाने भवानी ज्योत घाटशीळ रोड वाहनतळ येथील दर्शन मंडपातून मंदिरात सोडण्याचे नियोजन केले आहे. यासाठी शनिवारपासून महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवात भाविकांना घाटशीळ रोड वाहनतळ मार्गेच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
धार्मिक विधीचे वेळापत्रक
- 6 ऑक्टोबर : तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे.
- 15 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्री छबीना
- 16 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
- 17 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
- 18 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना
- 19 ऑक्टोबर : “ललिता पंचमी” देवीची पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 20 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 21 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना
- 22 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 3 वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, रात्री 8.10 वाजता पुर्णाहुती, रात्री छबीना
- 23 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक
- 24 ऑक्टोबर : विजयादशमी (दसरा) उषःकाली देवीची शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
- 28 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा
- 29 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा
- 30 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबीना.