परंडा – ‘तू गायींची तस्करी करतोस’ असा आरोप करत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांनी मिळून दोघांना दगड, स्टंप आणि पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्या स्कार्पिओ गाडीचीही तोडफोड करण्यात आली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी फिरोज आयुब पठाण (वय ३४, रा. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वारदवाडी फाट्या जवळील मायरा हॉटेलसमोर घडली. फिरोज पठाण आणि त्यांचे सहकारी शौकत शेख हे आपल्या स्कार्पिओ गाडीने (क्र. एमएच १४ एव्ही ६२४३) जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवली.
“तू गायीची तस्करी करतोस, तुझी गाडी आमच्या लोकेशनवर असते,” असे म्हणत आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लाथाबुक्क्या, दगड, क्रिकेटचे स्टंप आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. इतकेच नाही, तर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गाडीची तोडफोड करून मोठे नुकसान केले.
याप्रकरणी फिरोज पठाण यांनी १५ जुलै रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी:
- विराज सोले (रा. कात्रज, पुणे)
- परमेश्वर राऊत (रा. मानेगाव, ता. माढा)
- खंडू जाधव (रा. शेंद्री, ता. बार्शी)
- योगेश काळे (रा. तांबेवाडी, ता. बार्शी)
- अण्णा भोसले (रा. नान्नज, जि. सोलापूर)
या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, गैरकायदेशीर जमाव जमवणे, धमकी देणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.