धाराशिव: तालुक्यातील धारूर येथे पाण्याच्या बोरवेलची चावी देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांनी मिळून एका ४३ वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी, २ जुलै २०२५ रोजी सकाळी घडली असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शकील उस्मान सय्यद (वय ४३ वर्षे, रा. धारूर, ता. जि. धाराशिव) यांनी बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धारूर गावातील चौकात आरोपी इलाही उर्फ तोफीक रसुल सय्यद आणि रसुल मौला सय्यद (दोघेही रा. धारूर) यांच्याकडे पाण्याच्या बोरची चावी मागितली.
याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी शकील सय्यद यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले.
घटनेनंतर शकील सय्यद यांनी त्याच दिवशी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी इलाही उर्फ तोफीक सय्यद आणि रसुल सय्यद यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.