उमरगा : उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजी नगर तांड्यावर एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. खेळता खेळता साठवण तलावात पाय घसरून पडल्याने दोन लहान चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
सुशांत बाळू चव्हाण (वय ७) आणि प्रमोद प्रकाश चव्हाण (वय ८) अशी मृत मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर तांड्यातील काही शेतकरी कुटुंबे साठवण तलावाजवळच्या शेतात खुरपणीच्या कामासाठी गेली होती. यावेळी सुशांत आणि प्रमोद हे दोघे चुलत भाऊ जवळच खेळत होते. खेळण्याच्या नादात ते साठवण तलावाकडे गेले आणि पाय घसरल्याने पाण्यात पडले.
बराच वेळ मुले दिसेनाशी झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधाशोध केली असता, ती मुले तलावाच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने पाण्यातून बाहेर काढून दाळींब येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पाटील अश्विनी वाले यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली होती. मुलांच्या मृतदेहांचे येणेगुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद मुरूम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या अनपेक्षित आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे शिवाजी नगर तांडा आणि दाळींब परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.