धाराशिव – महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील (शिवसेना – उद्धव ठाकरे गट) यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांनी मोठी जाहीर सभा घेतली. या सभेत ठाकरे यांनी सत्तासंघर्ष, गद्दारी, आणि भाजप सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करताना जनतेशी संवाद साधला. शिवसेना फुटीनंतर अनेकांनी पक्ष सोडला, परंतु धाराशिवचे आमदार कैलास पाटील मात्र आपल्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे उद्धव ठाकरे यांनी कौतुकाने नमूद केले.
“शिवसेनेत फूट पडल्यावर अनेक आमदारांनी पक्षाचा त्याग केला आणि गद्दार बनले, पण धाराशिवचे आमदार कैलास पाटील गद्दार झाले नाहीत. ते सोन्याच्या लंकेत पोहोचले होते, पण त्यांनी ती सोडली. कारण ती लंका रावणाची होती,” असे ठाकरे म्हणाले. “शिवसेनेची मशाल त्या रावणाच्या लंकेला जाळून टाकेल,” असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी धाराशिवचे आमदार पाटील यांच्या निष्ठेचे विशेष कौतुक केले आणि त्यांना गद्दारांच्या तुलनेत सच्चे शिवसैनिक म्हटले.
भाजपवर कडाडून टीका: “१५ लाख कुणाच्या खिशात आले, अच्छे दिन कुणाचे आले?
भाजप सरकारवर निशाणा साधताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली. “१५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे सांगितले होते, पण ते कुणाच्या खिशात आले हे विचारले पाहिजे,” असे ते म्हणाले. “अच्छे दिन कुणाचे आले? आज शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय, सर्वच भाजप सरकारच्या निर्णयांमुळे त्रस्त आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जर लोकसभा निवडणुकीत आणखी १५-२० जागा कमी आल्या असत्या, तर नरेंद्र मोदी आज हिमालयात ध्यान करताना दिसले असते.” या विधानाने ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या लोकसभा जागांच्या स्थितीवर जोरदार टीका केली.
शेतकऱ्यांना हमीभाव आणि कर्जमाफीचे आश्वासन
महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात येतील, असे ठाकरे यांनी सांगितले. “शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, सोयाबीन आणि इतर पिकांना हमीभाव दिला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल,” असे त्यांनी जाहीर केले.
तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे यासारख्या योजना महाविकास आघाडी सरकार राबवणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. “हे सर्व निर्णय महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देतील आणि आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता प्रदान करतील,” असे ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारचा खोटारडेपणा उघड
ठाकरे यांनी भाजपच्या गद्दारांच्या कथनावरही जोरदार प्रहार केला. “गद्दारांना ५० खोके देण्यात काहींना लाज वाटत नाही, परंतु शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव देताना मात्र हात आखडता घेतला जातो,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या तोंडचे भाव न देणाऱ्या सरकारवर त्यांनी खदखद व्यक्त केली.
काश्मीरमधील ३७० कलम फक्त अदानीसाठी काढले
काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यावर ठाकरे यांनी टिप्पणी केली. “३७० कलम काढले गेले ते फक्त अदानींसारख्या उद्योगपतींना काश्मीरमध्ये जमीन घेता यावी यासाठी. हा निर्णय जनतेसाठी नसून विशिष्ट उद्योगपतींसाठी होता,” असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला.
या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका करत धाराशिवच्या जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले. “भाजपला धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रात विकास आणि शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या,” असे आवाहन त्यांनी केले.