धाराशिव – राज्यातील राजकीय रणभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या संघर्षाला धाराशिव जिल्ह्यात नवे परिमाण मिळणार आहे. चार मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यातील धाराशिव आणि उमरगा येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. धाराशिवमध्ये विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर उमरग्यात नवखे उमेदवार प्रवीण स्वामी यांना लोकांच्या आशीर्वादाने विजयासाठी रणांगणात पाठवण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका लावण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता उमरगा आणि सायंकाळी ७ वाजता धाराशिवमध्ये भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे या सभेतून आपल्या पक्षाच्या भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करणार, असे अपेक्षित आहे.
शुक्रवारी ( ८ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यात दौरा करत परंडा, धाराशिव आणि उमरगा येथे सभा घेतल्या होत्या. त्या सभांमधून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकेचा भडिमार केला होता. ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वावर शिंदे यांनी केलेल्या टीकेने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरे कोणत्या आक्रमक भाषेत उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही सभा गाजण्याची शक्यता असून, त्यांच्या मनात ठाकरे यांच्याकडून जाज्वल्य भाषण आणि प्रत्युत्तराची अपेक्षा आहे.
या सभांमधून उद्धव ठाकरे शिंदे गटाला नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार, शिंदे सरकारच्या निर्णयांवर, प्रशासनाच्या चुकांवर ताशेरे ओढणार की जनतेच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणार, याची चर्चा होत आहे. ठाकरे यांचे धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठे वजन आहे, आणि त्यांच्या प्रभावाने जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवण्याची क्षमता त्यांनी अनेक वेळा सिद्ध केली आहे.
शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे की, शिंदे यांच्या टीकेला ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर मिळणार असून, या सभेतून पक्षाच्या धोरणांचा स्पष्ट संदेश दिला जाईल. धाराशिव आणि उमरगा येथे ठाकरे यांचे भाषण म्हणजे निवडणुकीचा माहोल तापवणारी तोफ बनणार आहे, असे शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
धाराशिव जिल्ह्यात या दोन प्रमुख नेत्यांच्या सभांचा परिणाम काय राहील, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल, पण सध्या तरी दोन्ही गटांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे.